उत्पादक शेतकऱ्यांवर नवे संकट ; उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद

येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीला मनस्ताप सहन करावा लागला असतानाच मकाची खरेदी सुरू झाली अन काही दिवसातच बारदान उपलब्ध नसल्याने शासकीय आधारभूत किमतीचा मका खरेदीला अडथळे आले.त्या अडथळ्यांची शर्यत खरेदी सोबतच सुरू असतांना काल अचानक केंद्र शासनाने टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण देत ऑनलाइन पोर्टल बंद करून अचानक मका खरेदी बंद केली आहे.

येवला : तालुक्यातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीला मनस्ताप सहन करावा लागला असतानाच मकाची खरेदी सुरू झाली अन काही दिवसातच बारदान उपलब्ध नसल्याने शासकीय आधारभूत किमतीचा मका खरेदीला अडथळे आले.त्या अडथळ्यांची शर्यत खरेदी सोबतच सुरू असतांना काल अचानक केंद्र शासनाने टार्गेट पूर्ण झाल्याचे कारण देत ऑनलाइन पोर्टल बंद करून अचानक मका खरेदी बंद केली आहे.यामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे अशा सुमारे एक हजार शेतकऱ्यांच्या मका विक्रीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

अाॅनलाईन खरेदी
यावर्षी लॉकडाऊनमुळे खाजगी बाजारात मकाचे दर प्रचंड घटले आहे. आजही व्यापारी ११०० ते १४०० रुपये दराने मका खरेदी करत असताना त्या तुलनेत शासकीय आधारभूत किंमत योजनेत एक हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी होते. शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी हंगाम अंतर्गत खरीप मका खरेदी महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशन यांनी दिलेल्या पत्रानुसार २ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने खरेदी सुरू केली होती. शेतकऱ्यांनी मका विक्रीला नाव नोंदणी सुरु होताच रांगा लावून नाव नोंदणी केली.अनेक शेतकऱ्यांची मका विक्री झाली मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी मका विक्रीसाठी प्रतीक्षेत असताना उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंदचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही खरेदी पुन्हा पूर्ववत न झाल्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४०० ते ६०० रुपयांचा भुर्दंड सहन करण्याची वेळ येणार आहे.

शेतकऱ्यांना धक्का
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका शासकीय आधारभूत किमतीने ३१ डिसेंबर पर्यत खरेदी करण्याचे शासनाचे आदेश आहेत.मात्र बुधवारी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत शासनाने ऑनलाईन पोर्टल बंद केल्याने विक्रीला आलेल्या व प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे.१५ नोव्हेंबर नंतर मका खरेदी सुरू झाली असून राज्याचे ४ लाख ४९ हजार क्विटलचे उद्दीष्ट सोळा तारखेपर्यंतच पूर्ण झाले आहे.या काळात जिल्ह्यात अवघ्या १८२३ शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण होऊ शकल्याने खरेदीची प्रक्रिया ही संथ असल्याचे दिसते.

येवल्यात १००० शेतकरी वंचित
मका विक्रीसाठी जिल्ह्यात येथे सर्वाधिक १४१२ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी ६०० शेतकऱ्यांना खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले असून ३२८ शेतकऱ्यांकडून सुमारे २० हजार क्विंटल मका खरेदी झाली आहे.आता खरेदी बंद झाल्यामुळे हजारावर शेतकऱ्यांचे मका विक्री बाकी असून अचानक खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पुन्हा उद्दिष्ट वाढवून मिळत मका खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे. मका खरेदी न झाल्यास एकट्या येवला तालुक्यातच कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागेल.दरम्यान पहिल्या टप्प्यात खरेदीत झालेल्या तालुक्यातील १८२ शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी ९४ लाखाचे पेमेंट अदा केले असून पैसे मिळालेले शेतकरी मात्र समाधानी आहे.