मनपा आरोग्य यंत्रणेलाच कोविड : ठाकरे

नाशिक शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे, रेमडिसिव्हरसह इतर औषधाचा पुरवठा करण्यात यावा, सफाई कर्मचारी व इतर नर्स कर्मचारी वाढविण्यात यावे, रुग्णांची ऑक्सिजन पातळी तापसण्याकरिता वाढीव ऑक्सिमिटर देण्यात यावे, रुग्णालयात तीनच स्ट्रेचर असून त्यांचीही दुरावस्था झाली आहे.

    नाशिक : कोरोना विषाणूने नाशिक शहरात थैमान घातले असून नाशिक महापालिका व सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा व भोंगळ कारभार जनते समोर येत आहे. शहरातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या समोर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

    नाशिक मध्ये कोरोनाने अक्षरशः उच्छाद मांडला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा भयावह परिस्थितीत नाशिक महापालिकाची आरोग्य यंत्रणा व सत्ताधारी कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी अपयशी ठरत आहे. नाशिक मध्ये कोरोना बधितांची संख्या वाढत असताना सर्व कोविड सेंटर सुरू करणे अपेक्षित होते परंतु महापालिकेच्या व सत्ताधारीच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुरू होऊ शकले नाही. तसेच बिटको कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली, पहिल्या लाटेनंतर कमी करण्यात आलेला कंत्राटी कर्मचारी वर्ग सद्यस्थितीत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर कोरोना बाधित रुग्णांची देखभालीची जबाबदारी आल्याने तेही कोरोना बाधित होऊ लागले आहे. बिटको कोविड रूग्णालयात सफाई कर्मचारी नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांजवळ घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा उद्रेक वाढला आहे.

    रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडिसिव्हर व इतर औषधे रुग्णालयात नसल्याच्या वारंवार तक्रारी होत असताना देखील आठवडा भर ते रुग्णालयात पुरविण्यात आल्या नाही. रेमडिसिव्हरची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांवर देण्यात आली. कोरोना बधितांना औषध व इंजेक्शन देण्यासाठी कर्मचारी वर्गच नसल्याने तीही जबाबदारी रुग्णांचे नातेवाईक पार पाडत आहे. रुग्ण दाखल करण्यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नाही. प्लास्टिक बंदी असताना रुग्णांना प्लास्टिक पिशवी मध्ये जेवण पुरविण्यात येत आहे. कोरोनाची पहिली लाट असताना नाशिकमध्ये मृत्यूची संख्या कमी होती परंतु महापालिका व सत्ताधाऱ्यांच्या निद्रा अवस्थेमुळे आताच्या घडीला मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

    नाशिक शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावे, रेमडिसिव्हरसह इतर औषधाचा पुरवठा करण्यात यावा, सफाई कर्मचारी व इतर नर्स कर्मचारी वाढविण्यात यावे, रुग्णांची ऑक्सिजन पातळी तापसण्याकरिता वाढीव ऑक्सिमिटर देण्यात यावे, रुग्णालयात तीनच स्ट्रेचर असून त्यांचीही दुरावस्था झाली आहे. त्याकरिता स्ट्रेचरसह इतर साधनसामग्री देण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली असून शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनपा आरोग्य यंत्रणेलाच कोविड झाल्याचा खोचक टोला यावेळी लगावला.

    याप्रसंगी शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाशिकरोड अध्यक्ष मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, जय कोतवाल, विक्रम कोठुले, विशाल डांगळे, चैतन्य निकाळे, सौरभ पवार, विशाल घाडगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.