पतंगीची हौस ठरतेय पक्षांसाठी जीवघेणी

चिनी नायलॉन मांजावर बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होत असून, त्यामुळे पक्ष्यांचा जीव जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही.

नाशिक. इमारतीच्या गच्चीवर, मोकळ्या जागेत पतंग उडविण्याची हौस पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांच्या कालावधीत जवळपास शेकडो पक्षी जखमी होतात, तर अनेक पक्ष्यांना जीवही गमवावा लागतो. चिनी नायलॉन मांजावर (nylon manja) बंदी असली, तरीही या मांजाची सर्रास विक्री होत असून, त्यामुळे पक्ष्यांचा जीव जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही.

मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपळगाव शहरात पतंगोत्सवासाठी सर्रास मांजा विक्री सुरू आहे. पतंगाच्या मांजाचे दोर मात्र पिंपळगाव शहरातील नागरिक व पशू-पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत. अशातच झाडावर विसावा घेत असताना मंगळवारी  घुबड जातीच्या पक्ष्याच्या मानेभोवती मांजाचा वेढा पडला  घुबड मांजाच्या विळख्यात अडकून जखमी झाले. नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर पक्षीमित्र राजेंद्र पवार, विक्रम गिते, स्वप्नील देवरे, अग्निशमन दलाचे सुनील मोरे यांना पाचारण करण्यात आले. जखमी घुबडाला झाडावरून काढून मांजाच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले

पक्षी पुन्हा एकदा आकाशात उडण्यासाठी सज्ज

झाडावर विसावा घेत असताना मंगळवारी  घुबड जातीच्या पक्ष्याच्या मानेभोवती मांजाचा वेढा पडला. पिंपळगाव अग्निशमन दल व पक्षीप्रेमींनी त्या घुबडाला मांजाच्या फासातून मुक्त करून जीवदान दिले. प्राथमिक उपचारानंतर हा पक्षी पुन्हा एकदा आकाशात उडण्यासाठी सज्ज झाला.

मांजा विक्रेत्यांना चाप लावण्याची मागणी

पशुवैद्यकीय अधिकारी अल्केश चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी एक नागरिक दुचाकीवरून जात असताना मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाला होता. तर त्या वेळी एका घुबडालाही मांजामुळे रक्तबंबाळ व्हावे लागले. मांजा विक्रेत्यांना चाप लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.