व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे कांदा लिलाव ठप्प ; महिला राज असलेल्या कृउबात महिलांची गळचेपी

कांदा खरेदीसाठी परवाना असेल तरच नाफेडसाठी लागणाऱ्या कांद्याची खरेदी करून दिल्या जाईल अशा भूमिकेवर व्यापारी ठाम राहिल्यान परवाना तपासणीनंतर संबंधित संस्थेने लिलावात सहभागी घ्यावा, या तोडग्यावर लासलगाव बाजार समिती दुपारनंतर उर्वरित वाहनातील कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले.

  लासलगाव : लासलगाव बाजार समितीत महिला सभापती व उपसभापती असतांना महिला संस्थेची कांदा खरेदीसाठी गुरुवारी गळचेपी पाहायला मिळाली. विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याचे कारण पुढे करत कांदा लिलावातून व्यापार्यांनी काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव दुपारपर्यंत ठप्प झाले होते.

  शेतकरी संतप्त
  यावेळी कांदा लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करत असतानाही लासलगाव बाजार समिती सभापती व प्रशासनाने साफ दुर्लक्ष करत वेळ मारण्याचा प्रयत्न केल्याने या दुटप्पी भूमिकेमुळे शेतकरी संतप्त झाले आहे

  कांदा लिलाव थांबले
  गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ४ मे २०२० रोजी लासलगाव बाजार समितीतून कांदा खरेदी सुरू केली होती ५ ऑगस्ट २०२० पर्यंत ३१ हजार ६९४ क्विंटल कांद्याची खरेदी कमाल ११८७ रुपये ,किमान ५३२ रुपये तर सर्वसाधारण ९५० रुपयाने खरेदी केली होती मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नाफेडमार्फत केंद्र सरकारची कांदा खरेदी तब्बल एक महिना लेट सुरू झाली आहे गुरुवारी लासलगाव बाजार समितीतुन विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्थेने नाफेडसाठी दोन वाहनांतून कांद्याची खरेदी कमाल २०५८ तर किमान १८०० इतका बाजारभावाने केली असता व्यापारी निघून गेल्याने कांद्याचे लिलाव बंद पडल्याने नाफेड‌्साठी वाढीव कांदा खरेदी करतात आली नाही

  असा हाेता भाव
  लासलगाव बाजार समितीत १४०० वाहनातून कांद्याची २६ हजार क्विंटल आवक झाली होती त्यातील सकाळी ११ वाजेपर्यंत १०५७ वाहनातील कांद्याचे लिलाव झाले त्या कांद्याला कमाल २१३१ रुपये ,किमान ७०० रुपये तर सर्वसाधारण १८०० रुपये इतका बाजार भाव मिळाला.

  सहकार्य करावे
  लासलगाव बाजार समितीत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांधे होते नाफेडने कांदा खरेदी सुरु केली. यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव बंद पडले जर शेतकऱ्याला नाफेड खरेदी करत जास्त दर मिळणार असेल तर व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत कांदा उत्पादक शेतकरी पंकज जाधव यांनी व्यक्त केले.

  संघटना गायब!
  शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या शेतकरी संघटनेने पाठ फिरवण्याचे चित्र लासलगाव बाजार समितीत पाहायला मिळाले कांद्याचे लिलाव बंद पडल्यानंतर एकही शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बाजूने व्यापाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समोर आली नाही

  …तरच खरेदी करा
  कांदा खरेदीसाठी परवाना असेल तरच नाफेडसाठी लागणाऱ्या कांद्याची खरेदी करून दिल्या जाईल अशा भूमिकेवर व्यापारी ठाम राहिल्यान परवाना तपासणीनंतर संबंधित संस्थेने लिलावात सहभागी घ्यावा, या तोडग्यावर लासलगाव बाजार समिती दुपारनंतर उर्वरित वाहनातील कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले.

  लासलगाव बाजार समितीतून कृषी साधना महिला शेतकरी संस्थेच्या नावाने कांदा खरेदीसाठी लायसन्स घेतले आहे तसेच नाफेडला कांदा खरेदीसाठी आमच्या संस्थेकडे परवाना असल्याने लासलगाव, विंचूर आणि निफाड कांदा बाजार आवारात कांदा खरेदी करून द्यावी.

  - साधना जाधव, संचालिका , कृषी साधना महिला शेतकरी संस्था