nashik apmc

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सुधारणा होताच केंद्र सरकारने निर्यातबंदीचे हत्यार उपसले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कोणतीही पूर्व कल्पना न देता अथवा अवधी न देता सोमवारी निर्यातबंदीचे परिपत्रक काढल्याने कांदा उत्पादक(onion producers) शेतकऱ्यांसह निर्यातदारांना मोठा धक्का बसला आहे. असंतुलित वातावरण व पावसामुळे निम्म्याहून जास्त सडलेला कांदा फेकून द्यावा लागल्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाच्या दरात होत असलेल्या सुधारणांमुळे आशा पल्लवीत झालेली असतानाच केंद्र सरकारने निर्यातबंदीचे चटके दिल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त आहे. या निर्णयामागे बिहारच्या निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा सुरू झाल्याने संतापात भर पडली आहे.
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने तत्काळ कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत सोमवारी अधिसूचना जाहीर केली. या निर्णयामुळे कांदा व्यापाऱ्यांनी बाहेरील आयातदारांकडून ज्या मागणी नोंदविल्या होत्या, त्यानुसार तातडीने पाठविला जाणारा कांदा देशातच रोखण्यात आला. परिणामी कांदा व्यापारी व शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक(nashik) जिल्ह्यातील अनेक कांदा निर्यातदारांनी आपला माल बंदरावर निर्यातीसाठी पाठविला होता. मात्र ४५० हून अधिक कंटेनर थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, कांदा व्यापारी, निर्यातदार यांच्याकडून या निर्णयास विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यातबंदी लादली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचे वास्तव आहे. कांदा अगदी पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकत होता, आज मात्र चार-पाच दिवसांपूर्वी कांद्याचे उत्पादन खर्चापेक्षा कुठं दोन पैसे जास्त मिळण्याची दिवस आले असताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी करून शेतकरीविरोधी धोरण असल्याची केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाने संतापलेल्या शेतकऱ्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील आपण प्रथम शेतकरी असल्याचे सांगून आंदोलनात उडी घेतली.

शासनाने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने बाजार समित्यांच्या लिलावाच्या दुपारच्या सत्रात कांदा अक्षरशः हजाराने आपटला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्याचे पडसाद मंगळवारी बागलाणमध्ये उमटले. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शिर्डी-साक्री महामार्गावरील करंजाड येथील उपबाजार समिती समोर संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याने भरलेली ट्रक्टर अडवले लावून ठिय्या दिला.

प्रहार संघटनादेखील कांदा प्रश्नी आक्रमक झाली .संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार ,कपिल सोनवणे यांनी थेट येथील तहसील आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्षवेधले. यावेळी नायबतहसीलदार नानासाहेब बहिरमयांनी आंदोलनकर्त्याची भेट घेऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात किरण मोरे, राजेंद्र शेवरकर आदी सहभागी झाले होते.

सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी अकरा वाजता अचानक संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन वाहतूक अडवली. यावेळी निर्यातबंदी तत्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी मोदी सरकारवर टीका केली .पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे,पांडुरंग सोनवणे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव हे तीन हजार रुपयांच्या वर गेल्याने केंद्र सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता निर्यात बंदी केल्यामुळे आज सोमवारचा तुलनेत मंगळवारी एक हजार रुपयांची घसरण झाल्याने लासलगाव, विंचूर, उमराणे, पिंपळगाव बसवंत सहा जिल्ह्यातील विविध ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला जोपर्यंत कांद्याची निर्यातबंदी उठत नाही आणि कांद्याला तीन हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव मिळत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरु होऊ देणार नसल्याचा पवित्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्याने कांद्याचे लिलाव आज दिवसभर नाशिक जिल्ह्यात बंद पडलेले होते.

केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत लासलगाव येथे शिवसेनेचे निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुरसे ,महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा उपाध्यक्ष केदारनाथ नवले यांच्या सह शेतकर्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले तर विंचूर येथे केंदीय वाणिज्य मंत्री यांची प्रतीकात्मक तिरडी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवनाथ जाधव ,जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे यांनी नाशिक औरंगाबाद राज्यमार्गावर आणून ठेवत जाहीर निषेध करत आपला संताप व्यक्त केला.

  • कसमादेसह नाशिक, नगर, धुळे, जळगाव, पुणे विभागात अद्यापपर्यंत ३० ते ३५ टक्के चाळीत साठवलेला कांदा शिल्लक आहे. पावसाळी वातावरण व तापमानातील बदलांमुळे ५० टक्के कांदा चाळीतच सडला आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने नुकसान सहन करून कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादकांना थोडा फार दर मिळत असल्याना अचानक केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली आहे त्यामुळे कांद्याचे दर अचानक खाली आले आहेत, त्याच्या परीणाम बाजार समितीच्या आवारात आवके वर झाला आहे. अशीच परीस्थिती राहील्यास कांदा उत्पादकांना  आर्थिक फटका बसणार असून केंद्राने हस्तक्षेप करून निर्यात खुली करावी. – कुबेर जाधव, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना नाशिक 
  • आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे, म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला. अन‌् निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. परंतु शेतकऱ्यांचा कांद्याचा पूर्ण हंगाम वाया गेला आहे.
                                                                         – संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना