बाजार समित्या उघडताच कांदा दर काेसळले ; हवालदिल शेतकरी म्हणत आहे, सांगा जगावे तरी कसे?

‘जगावे तरी कसे’ आणि शेतात पिकवावे तरी काय? असा प्रश्न हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पडला. तिकडे आज कांद्याची इतकी झाली होती की, बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर उभे करण्यास जागा अपुरी पडली होती. सुमारे २० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. त्यामुळे भाव कोसळले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

  मनमाड : मार्च एंड आणि विविध सणाच्या सुट्ट्यामुळे तब्बल दहा दिवसांपासून बंद असलेली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आज (सोमवार) सुरु झाली. पहिल्याच दिवशी कांद्याची प्रचंड आवक होऊन भावात मोठी घसरण झाली. आज कांद्याला कमीतकमी ३ रुपये तर सरासरी ७ ते ८ रुपये प्रती किलो भाव मिळाला. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी हतबल आणि हवालदिल झाला. या भावात तर पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

  बाजार समितीतच मुक्काम
  मार्चअखेरचे कारण पुढे करून दरवर्षी बाजार समिती किमान आठ ते दहा दिवस बंद ठेवण्याची गेल्या अनेक वर्षाची प्रथा सुरु आहे. यंदा मार्च एंडपाठोपाठ विविध सणाच्या सुट्ट्या लागोपाठ आल्या होत्या. त्यामुळे तब्बल दहा दिवस लिलाव बंद ठेवण्यात आले होते. सोमवारपासून लिलाव सुरु होणार असल्याचे पाहून नंबर लवकर लागावा यासाठी अनेक शेतकरी तर शुक्रवारपासून कांदा घेऊन आले होते. दोन दिवस शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात मुक्काम केला होता.

  लाॅकडाऊनमुळे जेवण नाही!
  मनमाड शहरात शनिवार, रविवार दोन दिवस लॉक असतो. त्यामुळे मुक्कामी आलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना जेवण तर सोडाच साधा वडा पावदेखील मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोन दिवस उपाशी राहण्याची वेळ आली. शिवाय सध्या शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रात्री अंधारात डासांनी झोपू देखील दिले नाही.

  कवडीमाेल भाव
  आज सकाळी लिलाव सुरु झाल्यानंतर भावात मोठी घसरण झाली. जो कांदा काही दिवसांपूर्वी १५ ते २० रुपये किलो दराने विकला गेला. त्याच कांद्याला आज कमीतकमी ३ तर सरासरी ७ ते ८ रुपये इतकाच भाव मिळाला. एकीकडे अथक कष्ट करून कांदा पिकविला त्याला विकण्यासाठी बाजार समितीत उपाशी राहून दोन दिवस मुक्काम करावा लागला. एवढा त्रास सहन करून देखील कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

  जास्त आवक झाल्याने भाव गडगडले
  ‘जगावे तरी कसे’ आणि शेतात पिकवावे तरी काय? असा प्रश्न हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पडला. तिकडे आज कांद्याची इतकी झाली होती की, बाजार समितीच्या आवारात ट्रॅक्टर उभे करण्यास जागा अपुरी पडली होती. सुमारे २० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. त्यामुळे भाव कोसळले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.