दिंडोरी तालुक्यात आता पंचनाम्याची प्रतिक्षा

टाेमॅटाेला नुकताच समाधानकारक दर मिळत होता. सोयाबीन सोंगण्याच्या अवस्थेत तर खरिप पिकांची स्थिती चांगली होती. या पिकांना चांगला दर मिळेल, या आशेने शेतकरी वर्ग भविष्याचे नियोजन आखत असताना देवाने दिले. मात्र कर्माने नेले, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याचे सदाशिव चव्हाणके म्हणाले. द्राक्षबागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला तर उसाचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही.

  प्रवीण दोशी, दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पर्जन्यवृष्टीचा प्रकोप झाला व ढगफुटी सदृष्य पावसामुळे पिकांची हानी झाली. कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असला तरी आता नुकसानीचे पंचनामे होण्याची प्रतीक्षा नुकसानग्रस्तांना आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टाेमॅटाे, सोयाबीन व खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले.

  हाेत्याचे नव्हते झाले
  शेतीचे शेततळे झाले. गुडघाभर पाणी शेतात साचले होते. यामुळे अनेक पिकांची नासाडी झाली तर मानवी वस्ती व व्यावसायिक यांच्या दुकानात पुराचे पाणी शिरल्याने संसारपयोगी व जीवनावश्यक सािहत्याच्या नुकसानीची तर मोजदाद नाही. अस्मानी संकटाने होत्याचे नव्हते करुन टाकले. शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या उद‌्ध्वस्त झाला. उधार उसनवार हातउसने कर्ज काढून पिके जगविण्यासांठीचा संघर्ष मेहनत व कष्ट वाया गेले. डोळ्यादेखत झालेले नुकसान हे मनाला चटका लावणारे आहे.

  भयावह रूप
  टाेमॅटाेला नुकताच समाधानकारक दर मिळत होता. सोयाबीन सोंगण्याच्या अवस्थेत तर खरिप पिकांची स्थिती चांगली होती. या पिकांना चांगला दर मिळेल, या आशेने शेतकरी वर्ग भविष्याचे नियोजन आखत असताना देवाने दिले. मात्र कर्माने नेले, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याचे सदाशिव चव्हाणके म्हणाले. द्राक्षबागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला तर उसाचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. या सर्व पिकांच्या नुकसानीचा आकडा पंचनाम्यानंतर समोर येईलच; मात्र पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शरद शिंदे यांनी व्यक्त केली. निसर्गचक्राचे आपले बदलते व भयावह रूप दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाने अनुभवले आहे.

  शेतकरी मेटाकुटीस
  शेतकरीवर्गाला पुन्हा उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे. शेतकऱ्यांना विज बिलभरणे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुलांचे शिक्षण, विवाह शेतीचे नियोजन कर्जाची परतफेड पिकांवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावाचे निर्मूलनासाठी महागडी रासायनिक औषधे वापरणे यासाठी आर्थिक तरतूद करणे या सर्व बाबी आव्हानात्मक आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलेला आहे. तसेच मजुराची डोकेदुखी शेतकऱ्यांसमाेर अाहेच. स्थानिक मजूर मिळत नाही; दुसऱ्या तालुक्यातील मजूर अंगावर पैसे घेऊनही कामे करत नाही. त्यामुळे आहे त्या मजुरांबरोबर कुटुंबियांच्या सदस्यांनाही शेती कामे करावी लागतात. हे सर्व दुष्टचक्र शेतकरी वर्गामागे शुक्लकाष्टच्या स्वरुपात कायमचे मागे लागलेले आहे.