तब्बल ५ महिन्यांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस

 मनमाड-नाशिक-मुंबई(manmad-nashik-mumbai) अशा टप्प्यात धावणारी पंचवटी एक्स्प्रेस वाहतुकीवरील निर्बंधांमुळे पाच महिने बंद होती. मात्र आता अनलॉकचा कालावधी सुरु झाल्याने ती पुन्हा रुळावरून धावायला सुरुवात झाली आहे.

नाशिक: नाशिक(nashik) जिल्ह्यामधून मुंबईला नोकरी आणि व्यापारानिमित्त ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस(panchvait express) खूप महत्वाची आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल ५ महिन्यांनंतर पंचवटी एक्स्प्रेस आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र एक्स्प्रेसमध्ये आरक्षण केलेल्या लोकांनाच प्रवास करता येणार असल्याने आज या गाडीत पहिल्या दिवशी मनमाड भागातील ३२८ आणि नाशिक भागातील ३२० प्रवाशांनीच प्रवास केला. रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, खासदार हेमंत गोडसे तसेच प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे आणि रेल परिषद यांनी पंचवटी एक्स्प्रेसचे स्वागत केले.

आज सकाळी कोरोनाचे नियम पाळून मनमाड जंक्शन या स्टेशनवरून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे निघाली. नियमित पासधारक आणि सामान्यांना प्रवासाला अद्याप या गाडीतून प्रवासासाठी परवानगी नसल्याने आणि आरक्षण केलेल्या लोकांनाच प्रवास करता येणार असल्याने काही लोकांमध्ये थोडा नाराजीचा सूर दिसून आला.

मनमाड-नाशिक-मुंबई(manmad-nashik-mumbai) अशा टप्प्यात धावणारी पंचवटी एक्स्प्रेस वाहतुकीवरील निर्बंधांमुळे पाच महिने बंद होती. मात्र आता अनलॉकचा कालावधी सुरु झाल्याने ती पुन्हा रुळावरून धावायला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून ही एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी होती. अखेर आज ती मागणी पूर्ण झाली आहे.