प्रीतम मुंडेंना डावलल्याने पंकजा नाराज? फडणवीसांनी प्रतिप्रश्न उपस्थित करून टाळले उत्तर

तुम्हाला कोणी सांगितले त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. महाराष्ट्रातील चार नेत्यांना केंद्रात संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.

  नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचे ट्वीट न केल्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, मुंडे भगिनींच्या नाराजीबाबात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकल्याचे दिसून आले. कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिप्रश्न करीत फडणवीसांनी याबाबतचे उत्तर टाळले. उगाच काहीही बदनामी करू नका, असे सांगायलाही फडणवीस विसरले नाही.

  चर्चांवर निर्णय होत नाही

  तुम्हाला कोणी सांगितले त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. महाराष्ट्रातील चार नेत्यांना केंद्रात संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.

  दरम्यान, नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  सत्ताधाऱ्यांना मदत करण्यास आम्ही तयार

  राज्यकारभार करताना अनेकदा सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची मदत लागते, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे फडणवीस म्हणाले. ते नाशिकमध्ये परिवहन बससेवा लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळात सर्वच परिवहन वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्या. तोट्यात जाणारी बस मनपाला परवडणार का? डिझेल खूप महाग झाले आहे. त्यामुळे डिझेल बस बंद करा आणि त्या ठिकाणी इथॉनॉल आणा, असे केंद्रीय मंत्री नितील गडकरी सांगतात, असे फडणवीस म्हणाले. यावर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तुमचे नागपूर, पुणे खूप जोरात आहे.

  पण, आमचे नाशिक हळूहळू प्रगती करणारे शहर आहे. नागपुरला सर्व स्कुटर फिरतात, आमच्याकडे स्कुटीवर फिरतात. ट्विटरमुळे एका मंत्र्यांवर गदा आली असे वाचले, खरे-खोटे माहीत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका असा बसतो, अशी कोपरखळी भुजबळांनी रविशंकर प्रसाद यांच्या राजीनाम्यावरून मारली.