prahar mundan protest

येवला : कुणाचीही मागणी नसताना अथवा कांद्याच्या भावात(onion prize) कोणतीही वाढ झालेली नसताना केंद्र सरकारने अन्न व नागरी पुरवठा यांनी कांद्याची निर्यातबंदी(onion export banned) केली. याचा निषेध म्हणून प्रहार संघटनेच्यावतीने मुंडन करून केंद्र सरकारचे श्राद्ध घातले.
केंद्र शासनाने कोणतीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन आधीच मरणासन्न शेतकऱ्यांचा गळाच दाबलेला आहे. केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेव दानवे हे नेहमी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा डांगोरा पिटत असतांना त्यांनीच राज्यातील कांदा उत्पादकांच्या थेट पोटावरच वार करून आम्ही शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहोत, याचा पुरावाच निर्यातबंदी करून दिला आहे.
या निर्णयाविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यभर आक्रमक झाली असून, आज येवला तालुका प्रहार संघटनेच्या वतीने एरंडगाव येथे केंद्र शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करून पिंडदान करत सरकारचे श्राद्ध घालण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन,प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, शंकर गायके, वसंत झांबरे, पांडुरंग शेलार, जगदीश गायकवाड, रामभाऊ नाईकवाडे, गणेश लोहकरे, सचिन पवार, शिवाजी निकम, भागवत भड, सागर गायकवाड, कलीम पटेल, गोरख निर्मळ, संजय मेंगाने, महेबूब शेख, दत्तू बोरणारे, बाळू बोराडे, संतोष रंधे, निवृत्ती मढवई, वाल्मिक घोरपडे, शिवाजी खापरे, बाळासाहेब गुंजाळ, रशीद पटेल, सुदाम पडवळ, अशोक खापरे, दत्तू घोरपडे, काका पडवळ यांचेसह गाव व तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या दुर्दैवाने केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे राज्यातीलच असून त्यांच्याच शिफारशीवरून लादण्यात आलेली निर्यातबंदी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ अशी अवस्था झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून बच्चू कडू यांच्या आदेशाने तालुक्यात आज मुंडन करून सरकारचे श्राद्ध घालण्यात आले. शासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास यापुढे कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन उग्र करण्यात येईल. तसेच बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली लवकरच गनिमी काव्याने दिल्लीत आंदोलन करण्यात येईल.
                                                                               – हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना येवला