रस्त्यांची चाळण; वाहनचालक हैराण

बब्बू शेख , मनमाड : रस्ते आणि खड्डे हे जणू एक समीकरणच झाले आहे. रस्ता कॉंक्रिट असो किंवा डांबरी तो तयार केल्यानंतर मुदतीच्या आत या रस्त्यांची चाळण हाेणारच, हे जणू समीकरणच झाले आहे. असाच काहीसा प्रकार मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गाबाबत तसेच शहरातील विविध भागातील रस्त्यांबाबत घडत आहे. परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ आणि त्यांनतरही शहर परिसरात पावसाची अधूनमधून पावसाची होत असलेली रिपरिप यामुळे शहरातील जवळपास सर्वच कॉक्रिट आणि डांबरी रस्ते खड्डेमय होऊन त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सर्वच रस्त्यावर इतके खड्डे झालेले आहेत की, त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले तर तिकडे शहरातून जाणारा पुणे-इंदौर महामार्ग वर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघातांची मालिका सुरु झाली आहे. रस्ते कधी दुरूस्त हाेतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

-रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याची मागणी

जुन्या रस्त्यांबरोबरच लाखो रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. जर हलक्याफुलक्या पावसामुळे रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे तर जोरदार पाऊस झाल्यास काय होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला असून रस्त्यांची अवस्था पाहता त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येत असल्याने सर्वात जास्त भ्रष्ट्राचार रस्त्यांच्या कामात झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

-रस्त्याच्या दुर्दशेला पालिका प्रशासन, इंजिनियर आणि नगरसेवक यांचा हलगर्जीपणा जबाबदार

पावसाळा सुरु होण्याअगोदर अनेक रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे झालेले होते. त्यानंतर शहरात सलग जोरदार पाऊस झाला. काही दिवसांपासून अधून-मधून पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली विशेषत: शहरातील हुडको, शिवाजी नगर, हनुमान नगर, कीर्ती नगर, कॅम्प, दत्तमंदिर रोड, आंबेडकर चौक, स्टेशन रोड, पाकिजा चौफुली, आठवडे बाजार, कॉलेज रोड, उस्मानिया चौक, शिवाजी चौक, बोहरी कंपाऊंड यांसह शहरातील जवळपास सर्वच भागातील सिमेंट व डांबरी रस्त्यांची इतकी दुर्दशा झालेली आहे .त्याच्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे. शहरात कॉक्रिट रस्ता केल्यास त्याची मुदत किमान १० वर्षे तर डांबरी रस्त्यांची ७ वर्षे असते रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ठेकदार व्यवस्थितपणे काम करीत आहे की नाही, याकडे जातीने लक्ष देण्याची जबाबदारी पालिकेतील अभियंत्यांसोबत त्या-त्या भागातील नगरसेवकांची असते. मात्र रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांची दुर्दशा होत आहे. त्यामुळे रस्त्यांची झालेल्या दयनीय अवस्थेला एकप्रकारे पालिका प्रशासन व इंजिनियर आणि नगरसेवक यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाराचार झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त करून अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शिवाय ज्या भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली त्याला त्या भागातील नगरसेवकदेखील तेवढेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी केली आहे.