संकेतस्थळाद्वारे मिळणार सप्तशृंगी देवी दर्शनाचा पास ; प्रतितास १२०० भाविकांना दर्शन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा नवरात्रोत्सव सालाबादाप्रमाणे यात्रा प्रकारात भरणार नसून शासकीय आदेशा प्रमाणे फक्त भाविकांना श्री भगवती दर्शनाची संधी विश्वस्त संस्थेने निर्धारीत केलेल्या नियमानुसार करण्यात आलेली आहे.

    राकेश हिरे, कळवण : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सव परवा (दि.७) पासून सुरु होत  असून सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन पास बंधनकारक करण्यात आला आहे. संकेतस्थळावरून ऑनलाईन पासची सुविधा देण्यात आली असून प्रतितास १२०० भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा नवरात्रोत्सव सालाबादाप्रमाणे यात्रा प्रकारात भरणार नसून शासकीय आदेशा प्रमाणे फक्त भाविकांना श्री भगवती दर्शनाची संधी विश्वस्त संस्थेने निर्धारीत केलेल्या नियमानुसार करण्यात आलेली आहे.ऑनलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास १२०० प्रमाणे श्री भगवती दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध असेल.दर्शनार्थी भाविकाचे वय किमान १० वर्षापेक्षा अधिक व वय वर्षे ६५ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.दर्शनार्थी भाविकाचे कोविड-१९ संदर्भिय लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण असणे आवश्यक आहे.ज्या भाविकांचे कोविड-१९ संदर्भिय लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण नसतील अशा भाविकांनी ७२ तासातील
    आर.टी.पी.सी.आर तपासणीचा निगेटीव रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे.नवरात्रोत्सव कालावधी दरम्यान दि. ०७ ऑक्टोंबर ते दि. १५ ऑक्टोंबर व दि. १९ ऑक्टोंबर ते दि.२० ऑक्टोंबर या कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये खाजगी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.दर्शनार्थी भाविकांना कोविड-१९ संदर्भिय नियमानुसार मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.दर्शनार्थी भाविकांनी जिल्हा प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विविध सुचनांची, अटी व शर्तीची निर्धारीत पुर्तता करुन आवश्यक ते सहकार्य देणे अपेक्षित आहे.ऑनलाईन दर्शन पास संदर्भात निर्धारीत प्रक्रीया कशी असेल याबाबतचे तपशिल व्हीडीओ व प्रेझेंटेशन प्रकारात विश्वस्त संस्थेच्या संकेतस्थळासह फेसबुक व इतर सोशल मिडीयावरती माहितीस्तव सादर केलेली आहे. त्याचे अवलोकन करुन संदर्भिय ऑनलाईन पास बाबतची पुर्तता करुन घेण्यात यावी.तसेच संदर्भियऑनलाईन दर्शन पास संबंधीत तांत्रीक अडचण उदभवल्यास प्रशांत दामरे (संपर्क क्र. ९२२४३४६६०९) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्ट व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
    -संकेतस्थळावर पास उपलब्ध होणार
    सप्तशृंगी देवी दर्शनासाठी भाविकांनी ऑनलाईन माध्यमातून www.saptashrungi.netwww.ssndtonline.org या संकेतस्थळावरुन स्वत:चा दर्शन पास काढून घ्यावा. दर्शनार्थी भाविकांनी ऑनलाईन पासवर निर्धारीत करुन दिलेल्या वेळेच्या (स्लॉट) किमान १ तास अगोदर नांदुरी येथे पोलिस व महसुल प्रशासना मार्फत पासची तपासणी करुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनाने किमान अर्धातास अगोदर मौजे सप्तशृंगगड येथे दर्शन रांगेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.तसेच श्री भगवतीचा ऑनलाईन दर्शन पास हा नांदुरी ते सप्तशृंगगड बसने येतांना बसमध्ये दाखविणे अनिवार्य असेल.