सरपंच, ग्रामसेवकांनी लाखाेंचा निधी लूटला

मनमाड : एकीकडे ‘ना खाऊंगा और ना खाने दुंगा’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र आजही गाव खेड्यापासून शहरापर्यंत भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक घटना घडत आहे. अशीच एक घटना मनमाडपासून जवळ असलेल्या लक्ष्मीनगर या गावात समोर आली आहे.

गावाचा विकास करण्यासाठी शासनाने पाठविलेला लाखो रुपयांचा निधीचा सरपंच, ग्रामसेवकाने संगनमत करून गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज गावात एक पथक पाठविले आहे.

लक्ष्मीनगर येथील रोहिदास उगले, दिगंबर सोनवणे, सुभाष महाले, नानासाहेब महाडिक, भाऊसाहेब उगले, साहेब घाडगे, गंगाधर उगले, ज्ञानेश्वर महाले, अंकुश उगले यांच्यासह इतर ग्रामस्थांनी शासकीयअधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याची खोली व रुंदी वाढविण्याकरिता त्यातून मग्रारोहयो अंतर्गत गाळ काढण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतीला सुमारे १० लाख रुपयांचा निधी पाठविला होता. मात्र मग्रारोहयो अंतर्गत गाळ काढण्याचे कुठलेही काम झालेले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व पाटबंधारे विभागाच्या परवानगीने स्वखर्चाने धरणातील गाळ काढून आपापल्या शेतात टाकला आहे. मात्र ग्रामपंचायतीने हे काम मग्रारोहयो योजनेतून पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. हा गैरव्यवहार करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकाने गावातील काही मजुरांच्या बैंक खात्यात पैसे टाकले त्यानंतर तुमच्या खात्यात ग्रामपंचायतीचे चुकून पैसे आले ते परत करा नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, असा दम दिला. भीतीपोटी मजुरांनी त्यांच्या खात्यात आलेले पैसे परत केले. ग्रामपंचायतीचे सरपंच हे एका मोठ्या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष असून माझ्या पाठीशी माझ्या पक्षाचे नेते आहे. तुम्ही माझ काहीच करू शकत नाही, असा दम सरपंच देतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचे हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .