सेना-भाजपाचे पुन्हा ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’

उमेश पारीक,लासलगाव : राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपातून विस्तवही जात नव्हता. महािवकास आघाडीची स्थापना करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सेना नेते संजय राऊत यांनी यापुढे गावपातळीवरदेखील भाजपाला एकटे पाडू, असा निश्चय जाहीर केला हाेता. वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे चित्र  निफाड पंचायत समितीत दिसून आले. येथे शिवसेना-भाजपाने एकत्र येत सभापतीपदी सेनेच्या रत्ना संगमनेरे तर उपसभापतीपदी भाजपाच्या संजय शेवाळे यांची निवड केली.
निफाड पंचायत समितीतील या नवीन समीकरणाने पुन्हा युतीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. शिवसेना -भाजपा पुन्हा ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ सुरू झाले की काय, अशी चर्चा सामान्यातून व्यक्त हाेऊ लागली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युती असतानाही सन २०१७मध्ये झालेल्या निफाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न करता माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली २० जागांसाठी स्वतंत्र निवडणूक लढविण्यात आली होती त्यात शिवसेना १०, भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि अपक्ष ४ जागांवर विजयी झाले होते. त्यावेळी अपक्ष सदस्य गुरूदेव कांदे यांनी पाठिंबा दिल्याने बहूमत पूर्ण झाले असतानाही भाजपाचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांनी पाठिंबा दिल्याने उपसभापतीपदी संधी दिली जाणार असल्याचा शब्द माजी आमदार अनिल कदम यांनी दिला होता. सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा सुरासे यांनी राजीनामा दिल्याने तीन वर्षांनी तो शब्द पाळत आज निफाड पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीपदाच्या निवडीदरम्यान माजी अनिल कदम यांनी शिवसेनेच्या शिवडी गणाच्या सदस्या रत्ना संगमनेरे यांची सभापतीपदी तर विंचूर गणाचे सदस्य भाजपाचे संजय शेवाळे यांना उपसभापतीपदी विराजमान करत शब्द पाळल्याने निफाड पंचायत समिती शिवसेना-भाजपाची ही अनोखी युती यानिमित्ताने दिसून आली. संजय राऊत-फडणवीस भेटीनंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले असतानाच ही निवडणूक झाल्याने याची राजकीय वर्तुळात माेठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

निफाड तहसीलदार दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलावण्यात आली. यावेळी २० पैकी १५ सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभापती निवडणुकीत पंचायत समिती सदस्य रत्ना संगमनेरे व उपसभापतीपदी भाजपचे विंचूर गणातील सदस्य संजय शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. सभापतीपदासाठी रत्ना संगमनेरे यांचे नाव सदस्य शिवा सुरासे यांनी तर उपसभापतीपदासाठी शेवाळे यांचे नाव पंडित आहेर यांनी सूचविले. वेळेत कोणताही अर्ज न आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडणुकीनंतर नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, भाजप तालुकाध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, प्रकाश दायमा, खंडू बोडके आदी उपस्थित होते.

शिवसेनेने दिलेला शब्द पाळला
४ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना १०, राष्ट्रवादी ४, भाजप २, अपक्ष २ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी तत्कालीन आमदार अनिल कदम व शिवसेनेने भाजपला सत्तेत उपसभापती पदाचा शब्द दिला. होता तो राज्यात युती नसतानाही पाळला, असे सेनेतर्फे सांगण्यात आले.