ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत प्रा. वासंती सोर यांचे निधन

जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्वातंत्र सैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या तेवढ्याच निष्ठावंत कन्या प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.

    नाशिक : ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांचे काल रात्री उशिरा (रविवार, दि. १९ जुलै) वृद्धापकाळाने नाशिक येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले तुषार आणि तरंग, सुना गीता आणि सायली आणि नात तेजस्विनी असा परिवार आहे.नाशिकमधील सर्वोदय आणि जीवनउत्सव परिवाराच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्यावर सोमवारी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्वातंत्र सैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या तेवढ्याच निष्ठावंत कन्या प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी ६ वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत काही काळ त्यांच्या सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. तसेच जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसऱ्या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेख ही त्या नेहमी करत. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते.

    वयाच्या ८५ वर्षापर्यंत ही त्या पूर्ण कार्यरत होत्या. खादी आणि वस्त्र स्वावलंबन हा त्यांचा दुसरा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्या स्वतः तर रोज सूत कताई करतच, पण नाशिकमध्ये त्यांनी एक कताई मंडळ स्थापन केले होते. त्या कोणालाही अगदी आवडीने आणि मेहनतीने शास्त्र शुद्ध सूत कताई आणि चरखा शिकवत.