इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार  श्री रेणुकामातेचा नवरात्रोत्सव

चांदवड : साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ असलेली चांदवडची राजराजेश्वरी, कुलस्वामिनी श्री रेणुकामातेचा ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव यात्रा कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे शेकडो वर्षापासून चालत आलेली श्री रेणुकामातेचा नवरात्रोत्सव इतिहासात प्रथमच बंद राहणार आहे. दरम्यान, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा मंदिर प्रशासनांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक मधुकर पवार, सुभाष पवार यांनी दिली.

ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे राज्य शासनाने मार्च महिन्यापासून बंद केलेले धार्मिक देवस्थाने खुली न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका १७ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला बसला आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे चांदवड शहरातील श्री रेणुकामातेचा दरवर्षी भरवण्यात येणारा ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव चालूवर्षी बंद ठेवण्याचा निर्णय श्री रेणुकामाता देवी ट्रस्टने घेतला आहे.

चांदवडची श्री रेणुकामाता उत्तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविकांचे आराध्यदैवत असल्याने दरवर्षी लाखो भाविकभक्त नवरात्र काळात श्री रेणुकामातेच्या चरणी लीन होत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे यात्रोत्सव बंद राहणार असल्याने संपूर्ण मंदिर परिसर भाविकाविना सुनेसुने राहणार आहे. दर्शनासाठी भाविक मंदिर परिसरात येणार नाही यासाठी ठीक ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सव काळात मंदिर बंद राहणार असल्याने भाविकांना घर बसल्या श्री रेणुकामातेचे दर्शन घेता यावे यासाठी प्रथमच सोशल माध्यमांचा वापर केला जाणार आहे. यात व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम, मिडिया यावर श्री रेणुकामातेच्या मंदिरातील मुख्य गाभा-यात असलेली श्री रेणुकामातेची प्रतिमा दाखवली जाणार आहे. यामुळे घर बसल्या नागरिकांना भगवतीचे दर्शन घेणे सोपे होणार असल्याचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगितले.

श्री रेणुकामाता भाविकांच्या हाकेला धावून येणारी असल्याने अनेक भाविकांचे मनोव्रत पूर्ण होतात. मनोव्रत पूर्ण झाल्यावर अनेक भाविक नवरात्र उत्सव काळात देवी मंदिर परिसरात दरवर्षी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत दहा दिवस घटी बसत असतात. मात्र यावर्षी कोरोणाच्या महामारीमुळे नवरात्रोत्सवात मंदिर बंद राहणार असल्याने घटी बसणाऱ्या भाविकांनी मंदिरात गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.

- सुभाष पवार, व्यवस्थापक

शारदीय नवरात्रोत्सव काळात शासकीय नियमांचे पालन सकाळी, दुपारी व सायंकाळी तीन वेळेस श्री रेणुकामातेची विधिवद पूजा, महाआरती होणार आहे. यासाठी फक्त मंदिराचे महंत, सेवेकरी यांनाच परवानगी देण्यात आली आहे.