चांदवडच्या श्री रेणुकामातेचा यात्रोत्सव रद्द : दर्शनाची मोफत सुविधा ; श्री रेणुकामाता ट्रस्टचा निर्णय

श्री रेणुकामातेच्या नवरात्रोत्सव काळात दहा दिवस मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. या यात्रेत विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स, पाळणे, शोभेच्या वस्तूंसह इतर दुकाने लावले जातात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे यात्रा बंद असल्याने व्यावसायिक, दुकानदार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न एरणीवर आला आहे.

  चांदवड : संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची कुलदेवी व साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धेपीठ असलेल्या श्री रेणुका मातेचा नवरात्रोत्सव यंदा देखील बंद राहणार  आहे. दरम्यान, श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोफत खुले करण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री रेणुकामाता देवी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी घेतला आहे.
  काेराेनामुळे खबरदारी
  गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्याने श्री रेणुकामातेचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यामुळे मातेच्या भाविकात प्रचंड रोष पसरला होता. सध्या, राज्य शासनाने घटस्थापनेच्या दिवसापासून मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे श्री रेणुकामातेचा नवरात्रोत्सव साजरा होईल, अशी आशा वर्तवली जात होती. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हयातील वणी, कोटमगाव येथील मंदिर ट्रस्ट प्रशासनाने यात्रोत्सव रद्द केला आहे. याच  निर्णयाचीच अंमलबजावणी चांदवडच्या श्री रेणुका मातेचा यात्रोत्सव साजरा न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाने घेतला आहे.
  नियमांचे पालन आवश्यक
  या निर्णयामुळे मंदिर परिसरात व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे दुकाने लावता येणार नाही आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात दहा दिवस घटी बसणाऱ्या भाविकांना याही वर्षी घटी बसता येणार नाही आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना टप्याटप्याने दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. यासाठी ट्रस्टद्वारे मदिर परिसरात बॅरिकेटस‌् लावण्यात येत आहे. भाविकांवर करडी नजर ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून ४८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सॅनीटायझर, तोंडाला मास्क तसेच शारीरिक अंतर ठेवून दर्शन घेण्याचे आवाहन सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी केले आहे.
  साध्या पद्धतीने होणार आरती 
  नवरात्रोत्सव काळात दहा दिवस पहाटे, दुपारी बारा वाजता व सायंकाळी ८ वाजता देवीची काकड आरती केली जाते. गर्दी टाळण्यासाठी देवीची काकड आरती, पूजाविधी पुजारी, ट्रस्टचे कर्मचारी यांच्या हस्तेच होणार आहे. आरतीस स्थानिकांसह भाविकांनी गर्दी करू नये असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
  व्यावसायिकांत नाराजी
  श्री रेणुकामातेच्या नवरात्रोत्सव काळात दहा दिवस मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते. या यात्रेत विविध प्रकारची दुकाने, हॉटेल्स, पाळणे, शोभेच्या वस्तूंसह इतर दुकाने लावले जातात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे यात्रा बंद असल्याने व्यावसायिक, दुकानदार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न एरणीवर आला आहे. यंदा मंदिरे उघडल्याने यात्रोत्सव भरविला जाईल अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली होती. मात्र यात्रा न भरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने व्यावसायिक, दुकानदार यांच्यात पुन्हा नाराजी पसरली आहे.