विचित्र अपघात ! दुचाकीवर ट्रक उलटल्याने दाेघांचा मृत्यू तर कारमधील पाच जण आश्चर्यकारकरित्या बचावले

मनमाड : येथील बेथेल चर्च समोर पुणे-इंदौर महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक कार आणि मोटरसायकलवर पलटी झाल्यामुळे या विचित्र अपघातात मोटारसायकल वरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील सर्व ५ जण चमत्कारिकरित्या बचावले. अपघात इतका भीषण होता की, कार आणि मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मनमाड : येथील बेथेल चर्च समोर पुणे-इंदौर महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक कार आणि मोटरसायकलवर पलटी झाल्यामुळे या विचित्र अपघातात मोटारसायकल वरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील सर्व ५ जण चमत्कारिकरित्या बचावले. अपघात इतका भीषण होता की, कार आणि मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सार्वजनिक बांधकाम िवभागाचे दुर्लक्ष
पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महामार्गावर पडलेले मोठ मोठे खड्डे, स्पीड ब्रेकरवर नसलेले पांढरे पट्टे आदी मुळे येथे रोज अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे आणखी किती बळी घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवून स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे रंगवेल, असा प्रश्न वाहनधारकासोबत नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नशीब बलवत्तर म्हणून बचावले
याबाबत अधिक वृत्त असे की, पुणे येथून ट्रक (एमएच-०९, जीएच-५४५३) इंदौरकडे जात असताना शहरातील बेथेल चर्च समोर असलेले स्पीड ब्रेकर चालकाला दिसून आला नाही त्यामुळे त्याच्यावरून ट्रक वरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक बाजूने जाणारी (एमएच-४१, एएम १८३५) या कारसोबत (एमएच ४१, पी ३४९) या मोटारसायकलवर उलटला. ट्रक खाली दाबल्या गेल्यामुळे मोटारसायकलवरील प्रवीण सूर्यवंशी आणि रविंद्र गोडसे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा तोल जात असल्याचे पाहून कार चालकाने गाडी थांबवताच कारमधील सर्व जण तातडीने बाहेर पडले. त्यामुळे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचा जीव वाचला. अपघातात कार चालक व क्लीनर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रस्त्यावर माेठमाेठे खड्डे
पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, सहाय्यक निरीक्षक गीते यांनी घटनास्थळी येवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी ट्रक चालक बन्सीलाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-इंदौर महामार्ग हा मनमाड शहरातून जात असून, सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. शिवाय चर्चसमोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे रंगविण्यात आले नसल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकांना स्पीड ब्रेकर दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात. असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील अधिकारी दखल घेत नाही त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या अपघातांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.