“नवराष्ट्र इम्पॅक्ट’ : सुवर्णा जगताप यांनी जपली बांधिलकी ; कृउबा सभापतींकडून पीडित कुटुंबांना शिधावाटप

गेल्या आठवड्यातील मंगळवारी गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दुपारी चार वाजेच्या दरम्यान सुरू झालेला मुसळधार पाऊस सात वाजेनंतरही सुरू होता. या पावसाच्या पाण्यामुळे लासलगाव हद्दीतून जात असलेल्या गाढवे नाल्याला नदीचे स्वरूप प्राप्त होत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने हे पाणी प्रताप सागर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झाले.

  लासलगाव  :  गेल्या नऊ दिवसानंतर निमगाव वाकडा हद्दीतील प्रताप सागर तलावा जवळील पूरग्रस्त ३४ कुटुंबांना अखेर मदतीचा हात मिळाला आहे. दैनिक नवराष्ट्रच्या बातमीची दखल घेत लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी किराणा उपयोगी वस्तू असलेल्या ३४ हजार रूपयांचे शिध्याचे पूरग्रस्त ३४ कुटुंबांना वाटप करत माणुसकीचे दर्शन घडविले.
  भयावह घटना
  गेल्या आठवड्यातील मंगळवारी गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दुपारी चार वाजेच्या दरम्यान सुरू झालेला मुसळधार पाऊस सात वाजेनंतरही सुरू होता. या पावसाच्या पाण्यामुळे लासलगाव हद्दीतून जात असलेल्या गाढवे नाल्याला नदीचे स्वरूप प्राप्त होत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने हे पाणी प्रताप सागर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झाले. प्रताप सागर तलावाचा बंधारा फुटल्यामुळे रात्री साडेनऊ दहा वाजेच्या दरम्यान हाहाकार उडवणारी घटना घडली होती.
  पीडितांत समाधान
  ३४ कुटुंब राहात असलेल्या झोपड्यांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसेच संसार उपयोगी वस्तू या पाण्यात वाहून गेल्या या पुराच्या पाण्यातून स्वत:ला आणि मुलाबाळांना वाचवल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही; पण त्या दिवसापासून आजपर्यंत खावे काय आणि जगावं कसे असा प्रश्न या ८० ते ९० ग्रामस्थांसमाेेर उभा होता. मात्र गव्हाचा आटा, तांदूळ, दाळ, साखर, चहा, बिस्कीट, तेल, मीठ यांसह किराणा उपयोगी वस्तू असलेला शिधाचे ३४ पॅकेट तयार करून हा शिधा घेऊन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप या आपल्या सहकारी स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रूपा केदारे, सिंधु पलाहळ व निलेश सालकडे यांच्यासह प्रताप सागर तलावाजवळ दाखल झाल्या पूरग्रस्त ३४ कुटुंब प्रमुखांना बोलून एक हजार रुपये किमतीच्या किराणा वस्तू असलेले शिधा पॅकेट प्रत्येकाला वाटप करण्यात आले. यावेळी या आदिवासी बांधवांच्या डोळ्यातील असू पूसल्याने चेहऱ्यावर हसू दिसून आले.
  मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार
  तसेच या बातमीची दखल निफाड तहसील कार्यालयाने सुद्धा घेतली. तातडीने पंचनामे करण्यासाठी विंचूर येथील प्रभारी मंडल अधिकारी चंद्रभान पंडित, कोतवाल सागर म्हसकर यांना निमगाव वाकडा प्रताप सागर येथे पाठविण्यात आले. पंचनामे करून बेघरांसाठी तसेच शासकीय मदतीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यांनतर शासन स्तरावर मदतीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.