शेतमाल तारण याेजनेचा लाभ घ्या : बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप

लासलगांव : निफाड तालुक्यात मका व सोयाबीनचे काढणीचे काम चालू झाले असून, सदरचा शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणुन लासलगांव बाजार समितीने सन २०२०-२१ या हंगामाकरीता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे या संस्थेमार्फत सन १९९०-९१ पासुन राबविण्यात येणा-या या योजनेंतर्गत बाजार समिती सन २०२०-२१ या हंगामाकरीता मका, सोयाबीन, चना व गहू या शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतक-यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरित्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, चना व गहू हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणुन ठेवला जाईल. त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्व-िनधीतून संबंधित शेतक-यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे. संबंधित शेतक-यांचा खाते उतारा व ७/१२ उता-यावरील मका, सोयाबीन, चना व गव्हाचे लागवड क्षेत्र व उत्पादीत माल याचे प्रमाण ठरवून किंमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ०६ महिन्यांचे मुदतीने ०६ टक्के व्याजदराने शेतक-यांना अदा करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या ०६ महिन्यांकरीता ०८ टक्के व त्यापुढील ०६ महिन्यांकरीता १२ टक्के व्याज दराने आकारणी केली जाणार आहे. १८ महिन्यांनंतर सदर कर्जास मुदतवाढ मिळणार नाही.

तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी ९९२२६३१२४१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.