मुंबई-आग्रा महामार्गावर  टेम्पाे ट्रॅव्हलर जळून खाक; चाैदा प्रवासी बचावले

याप्रसंगी इगतपुरी नगरपरिषदेच्या अगि्नशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर टोल प्लाझाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने प्रवाशांना वेळीच वाहनातून बाहेर काढल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रैव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळून खाक झाले. मात्र चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाटयाजवळ मुंबईहून भंडारदराकडे जाणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरला शाॅर्टसर्कीटमुळे अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले तर त्यातील चौदा प्रवासी सुखरूप बचावले.

शाॅर्टसर्किटमुळे आग
शनिवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुंबईहून भरधाव वेगाने येणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर (एम.एच. ४३ एच. ४७५६) ही गाडी चौदा प्रवाशांना घेऊन भंडारदरा येथे सहलीसाठी जात असतांना वाहनात शॉर्टसर्कीट झाल्याने इगतपुरी महामार्गावरील तळेगाव फाटा येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारात अचानक आग लागली. घटना घडताच या गाडीतील प्रवाशांना टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे जळून खाक झाला.

प्रवासी बचावले
याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात घटना नोंद करण्यात आली आहे. याप्रसंगी इगतपुरी नगरपरिषदेच्या अगि्नशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर टोल प्लाझाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने प्रवाशांना वेळीच वाहनातून बाहेर काढल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यावेळी टोल प्लाझाचे रूट पेट्रोलींग अधिकारी जाहिद खान, कंट्रोलरूम अधिकारी राजु चंद्रमोरे, सुरक्षावाहक राजू उघडे, सतीश परदेशी, मुन्ना पवार, वसीम शेख आदी कर्मचारी व इगतपुरी नगरपरिषदेचे अग्नीशामक दलाचे वाहक नागेश जाधव व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवाशी सुखरूप बचावले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इश्वर गंगावणे सह पोलीस कर्मचारी करीत आहे.