मृतांच्या नातेवाईकांच्या संतापानंतर प्रशासनाला आली जाग; चौकशी आणि समन्वयासाठी समित्यांची स्थापना

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात  काल (दि २१) झालेल्या मृत्यूतांडवानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून चौकशी आणि समन्वयांसाठी प्रशासकीय अधिकारी, तज्ज्ञांच्या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय आणि चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर महापालिका आयुक्तांनीही एका समितीची घोषणा केली आहे.

  नाशिक : नाशिक महापालिकेच्या  झाकीर हुसेन रुग्णालयात काल झालेल्या वायुगळती प्रकरणात निष्पाप रुग्णांचे जीव गेल्यानंतर आता  अतरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी समितीने केली आहे. राज्यात आणि देशात या घटनेचे प्रतिसाद उमटल्यानंतर अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. मात्र, आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बळी घेणा-यांवर काय कारवाई होणार हे मात्र मृतांच्या नातेवाईकांना  कुणी सांगू शकले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  प्रशासन खडबडून जागे झाले

  दरम्यान, नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात  काल (दि २१) झालेल्या मृत्यूतांडवानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून चौकशी आणि समन्वयांसाठी प्रशासकीय अधिकारी, तज्ज्ञांच्या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय आणि चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर महापालिका आयुक्तांनीही एका समितीची घोषणा केली आहे.

  कोरोनाच्या दहशतीपेक्षा अधिक भयावह

  कालच्या दुर्दैवी घटनेनंतर नाशिकमध्ये कोविड-१९ रूग्णांवर अनेक रुग्णालयात उपचार करण्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते. तर दुर्घटना ग्रस्त झाकीर हुसेन रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकां कडून कागदपत्रांची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होती. या शिवाय रुग्णालयातील कालच्या प्रकाराची दहशत कोरोनाच्या साथीच्या दहशतीपेक्षा अधिक भयावह असल्याचा अनुभव घेतल्याने परिसरात तणावाची छाया अद्याप निवळली नाही.

  सात सदस्यीय चौकशी समिती

  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

  मनपा आयुक्तांची सात सदस्यीय समिती

  महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पुढाकाराने दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असून, त्यात आयुक्त यांच्या व्यतिरिक्त स्थायी समितीचे तीन सदस्य तसेच तीन तंत्रज्ञ याचा समितीत समावेश करण्यात आला आहे.