चार दिवसांत उध्वस्त झाले घर ; कुटुंबातील चाैघांचा काेराेनाने मृत्यू

परदेशी कुटुंबातील कैलास परदेशी यांचा कोरोना अहवाल बाधित होता. मृत किशोर परदेशी व संगीता परदेशी जळगाव येथे खासगी कोरोना रुग्णालयात उपचार घेत होते. पण त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणतीही अधिकृत सूचना नाही, असे पालिकेचे अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले. तर कोरोनाला प्रतिबंध बसावा, यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, काही त्रास जाणवल्यास लागलीच तपासणी करून घ्यावी, असे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी आवाहन केले.

  सावदा : जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा संक्रमण वाढत असून, सावदा येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेला आहे. तर घरातील सुनेच्या मृत्यूचा व मुलांच्या आजाराचा धसका घेतल्याने वृद्ध आईचाही मृत्यू झाला आहे. मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. येथील (स्व.) गणपतसिंह परदेशी यांचे पाच मुलांचे मोठे कुटुंब व संख्येने मोठा परिवार आहे. पाच- सहा वर्षांपूर्वी या कुटुंबातील दोन ज्येष्ठ बंधू रणजितसिंह व सतीशसिंह परदेशी व एका बहिणीचा आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातून हा परिवार सावरत नाही तोच या कुटुंबाला पुन्हा या वर्षी कोरोना विषाणूने पछाडले आणि चार दिवसांत एकामागून एक मृत्यू ओढवले.

  सुनेचा मृत्‍यू अन‌्‌ मुलाला कोरोनाचा आईला धसका
  आधी घरातील संगीता किशोरसिंह परदेशी (४०) यांचा रविवारी (दि. २१), तर सोमवारी (दि. २२) वृद्ध आई कुंवरबाई गणपतसिंह परदेशी (८५) यांचे निधन झाले. त्यानंतर मुलगा किशोरसिंह परदेशी (५४) यांचा बुधवारी (दि. २४) मृत्यू झाला. नियतीचा हा खेळ एवढ्यावरच न थांबता गुरुवारी (दि. २५) पुन्हा याच कुटुंबातील कैलाससिंह परदेशी (५६) यांचा कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  परदेशी कुटुंबातील सुनेपाठोपाठ वृद्ध आई, दोन मुले अशा एकूण चार जणांचा बळी गेला. किशोर व संगीता या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुली व एक मुलगा या तिघांच्या डोक्यावरील मातृ, पितृछत्र हरपले आहे. परदेशी कुटुंब शिवसेनेशी निगडित आहे. राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या या कुटुंबातील मृतांपैकी एक जण ‘एलआयसी’चे विकास अधिकारी, तर एकजण पत्रकार असल्याने या कुटुंबाचा सामाजिक कार्य व व्यवसायामुळे समाजातील सर्वच क्षेत्रात संपर्क व संबंध आहे. त्यामुळे कुटुंबावर कोसळलेल्या या पहाडाएवढ्या दुःखाने समाजमनही सुन्न झाले आहे. विविध क्षेत्रांतील अनेकांनी परदेशी कुटुंबीयांना भेटून व फोन करून या दुःखातून त्यांना सावरता यावे, यासाठी धीर दिला.

  स्थानिक प्रशासन अनभिज्ञ