मोदी सरकार शेतकऱ्यांना विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत मात्र प्रत्यक्ष कृती शेतकरी विरोधी

मालेगाव : मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत असतांना केंद्र सरकारने अचानक कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले. मोदी सरकार (Modi Government)शेतकऱ्यांना शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतू, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मालेगाव तालुका अध्यक्ष टेहेरे येथील शेतकरी चंद्रकांत धर्मा शेवाळे यांनी केला.

मालेगाव येथे कांदा निर्यातबंदीविरोधात संघटनेच्यावतीने सटाणा नाका भागातून सटाणा रोड, साठफुटी रोड मार्गे तहसीलदार कार्यालयावर संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या प्रातिनिधिक तिरडी मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले अाहे की, केंद्र शासनाने (Central Government)लागू केलेला कांद्यावरील निर्यात बंदी आदेश त्वरित मागे घ्यावा, व शेतकऱ्यांवर होणार अन्याय त्वरीत दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.मोर्चात प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टरवर शेतकरी गळफास लावून आत्महत्या करीत असल्याचे दाखविण्यात आले. तसेच माेर्चाच्या सुरवातीला चार शेतकरी यांनी शासनाच्या तिरडीस खांदा देऊन अंत्ययात्रा काढली.

मोर्चात संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र शेवाळे, मधुकर शेवाळे, विरकुमार शेवाळे, संदीप शेवाळे, योगेश शेवाळे, अरुण शेवाळे, जितेंद्र शेवाळे, रणजित शेवाळे, पंकज हिरे, प्रभाकर शेवाळे, अॅड. चंद्रशेखर शेवाळे, आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाडीले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता व मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आला.