सिडकोवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ; नळांना येतेय रसायनमिश्रीत दुर्गंधीयुक्त पाणी

परिसरातील नागरिकांनी आरोग्याला बाधा होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस शुद्ध पाणी येईपर्यंत पाणी वापरु नये, असे आवाहन शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी केले आहे.

  सिडको : अंबड परिसरात रसायन मिश्रीत दुर्गंधीयुक्त लाल रंगाचे पाणी येत असून या दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे दिपक दातीर मळा, सरपंच मळा, शिरसाठ मळा, रामकृष्ण दातीर मळा, मंदाताई दातीर मळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  नगरसेवकांनी गांभीर्य नसल्याचा आरोप
  या परिसरालगत अंबड औद्योगिक वसाहत असून बहुसंख्य कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था नसल्याने हे पाणी वॉल चेंबर तसेच क्षतीग्रस्त जलवाहिन्यांमधून थेट नागरिकांच्या घरातील नळांना येते. यासंदर्भात महानगरपालिकेच्या कार्यालयात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यल्प दाबाने व रात्रीच्या २-३ वा. पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्यावर आजतागायत मनपाच्या अधिकारी व नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.

  आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
  मध्यरात्रीनंतर उशिरा पाणी येत असल्याने अंधारात पाण्याचा रंग कळत नाही. दूषित पाणी वापरण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना पोटदुखणे, मळमळ होणे, असे आजार उद्भवल्याचा घटनाही घडल्या आहेत. याभागातील मनपा अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही नागरिकांना शुध्द पिण्यायोग्य व मुबलक पाणी मिळत नाही. परिसरातील रहिवासी औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना विनंती करून कारखान्यांमधून पायपीट करून पाणी आणून दैनंदिन गरज भागवितात. अनेकवेळा आंदोलने-मोर्चे काढूनही मनपा अधिकाऱ्यांना या समस्येची जाणीव होत नसल्याची संतप्त प्रतिक्रियाही येथील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

  शुद्ध पाणी येईपर्यंत पाणी वापरु नका
  परिसरातील नागरिकांनी आरोग्याला बाधा होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस शुद्ध पाणी येईपर्यंत पाणी वापरु नये, असे आवाहन शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी केले आहे.