ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, प्रसुतीगृहात ‘हे’ सापडल्याने खळबळ

गेल्या काही दिवसांपासून चक्क प्रसूतीगृहात रोज वापरलेले निरोध सापडत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालय अधिकच चर्चेत आले आहे

 सटाणा : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयातील (Rural hospital) कर्मचाऱ्यांनी हद्द पार केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चक्क प्रसुतीगृहातच (maternity ward) वापरलेले निरोध सापडत असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसे पहिले तर बागलाणची आरोग्य सेवा तशी रामभरोसेच आहे. बहुतांश रुग्णांची हेळसांड होते; अथवा दगावतात ते फक्त दांडीबहाद्दर कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यामुळे सटाणा ग्रामीण रुग्णालयदेखील त्याला अपवाद नाही. अधिकारी विरुद्ध कर्मचारी असा नेहमीच वाद उफाळून आल्याचे बघायला मिळाले आहे.

कोणताही चांगला अधिकारी आला की स्थानिक कर्मचाऱ्यांनी पुढाऱ्यांना हाताशी धरून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. याच कारणांमुळे नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून चक्क प्रसूतीगृहात रोज वापरलेले निरोध सापडत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालय अधिकच चर्चेत आले आहे.या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वेळोवेळी ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संशय व्यक्त केला जात आहे.

काय आहे तक्रार अहवाल ?

सकाळी नियमित कक्षसेविका वर्ग-४ श्रीमती हिरुबाई पवार या स्वच्छता करत असतांना प्रसुतीगृहाच्या बाथरुममध्ये तीन वापरलेले कंडोम आढळून आले. त्यांनी सदरचा प्रकार वैद्यकीय अधिक्षक यांच्या नजरेस आणून दिला. आदल्या दिवशी रात्रपाळीसाठी महेंद्र रौदळ, स्वच्छता सेवक जितेंद्र सूर्यवंशी, स्वच्छता सेवक व अजय देवरे, सुरक्षा रक्षक म्हणून डयुटीवर होते. असाच प्रकार यापूर्वी वरील कर्मचारी यांचेच डयुटीमध्ये वारंवार घडलेला आहे.

सदर कर्मचारी यांचे बाबत बऱ्याच तक्रारी आहेत. डयुटीवर वेळेवर न येणे, डयुटीवर असतांना मध्येच बेपत्ता होणे, अरेरावीने वागणे, वरिष्ठांचे आज्ञा पालन न करणे, डयुटीवर असतांना मद्यपान करणे असे प्रकार त्यांचेकडून वांरवार घडत आहेत. वरील कर्मचारी हे एमव्हीजी ग्रुप कं. लि. नाशिक यांचे अंतर्गत येत असून, ब-याच वेळा वरील कंपनी प्रतिनिधीस वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रत्यक्ष भेटीत गेल्या दोन वर्षात वारंवार सांगण्यात आले आहे. या संदर्भात त्यांचेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. या रुगालयात वरील कंपनीकडून श्रीमती सुवर्णा शेवाळे यांची डयुटी स्वच्छता सेवक म्हणून आहे. त्यांच्याविषयी देखील वरिष्ठांनी सांगितलेल्या कामात टाळाटाळ करणे व डिलेव्हरी रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या ब-याच तक्रारी डयुटीवरील अधिपरिचारीका व रुग्णांचे नातेवाईक यांनी लेखी स्वरुपात कार्यालयाकडे केल्या आहेत. यामुळे एमव्हीजी कंपनीमार्फत तात्काळ नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे नमूद केले आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असलेला विसंवादच अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. अनेक वेळा येथील कर्मचारी आणि अधिकारी यांना त्या कारणाने आमने-सामने असतात. येथील कामकाजात पुढाऱ्यांचा हस्तक्षेपही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे चांगल्या अिधकाऱ्याला काम करताना अनेक अडचणी येतात. पुढाऱ्यांनीदेखील चांगल्या अधिकाऱ्याला सहकार्य करून त्याच्या कामात अडचणी कशा येणार नाहीत, याची काळजी घेतल्यास कर्मचाऱ्यांवर वचक राहील आणि अशा प्रकारांना आळा बसेल. अधिकारी-कर्मचारी विसंवादामुळे येथे येणाऱ्या रुग्णांवरही त्याचा परिणाम होत असतो. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांवरही याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनीदेखील कर्मचाऱ्यांशी सलोखा कसा राहील, यादृष्टीने अधिकाधिक प्रयत्न करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.