नदीवर गेलेल्या युवकावर वीज कोसळल्याने युवक ठार ; इगतपुरी तालुक्यातील घटना

वीज कोसळून मयत झालेला युवक हा गरीब व आदिवासी कुटुंबातील असून शासनाने या युवकाचा कुटुंबियास तात्काळ अर्थसहाय्य करण्याची मागणी सरपंच मारुती आघान, उपसरपंच गणेश गायकर, शेनवडचे उपसरपंच कैलास कडू आदींनी केली आहे.

  घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील दौंडत रोडवर असलेल्या दारणा नदीवर हातपाय धुण्याच्या प्रयत्नात असलेल्या १७ वर्षीय युवकावर अचानक नैसर्गिक वीज कोसळली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या युवकास तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तो मयत झाला. या घटनेने खैरगाव शिदवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

  उपचारापूर्वीच मृत्यू
  याबाबतची माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील खैरगाव (शिदवाडी) येथील अहिलु देवराम शिद वय १७ हा युवक काल दि २ रोजी आपल्या आजोबासमवेत घटनास्थळाच्या भागात आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व विजेचा गडगडाट सुरु होता. याचवेळी अहिलु शिद हा युवक दौंडत रोडवर असलेल्या दारणा नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला असता अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. या युवकाला तात्काळ उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच तो मयत झाला.
  खैरगावचे उपसरपंच गणेश गायकर यांनी घोटी पोलीस स्टेशनला याबाबत घटनेची माहिती दिली. घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हवालदार कोरडे करीत आहेत.

  शासनाने मदत करावी
  दरम्यान वीज कोसळून मयत झालेला युवक हा गरीब व आदिवासी कुटुंबातील असून शासनाने या युवकाचा कुटुंबियास तात्काळ अर्थसहाय्य करण्याची मागणी सरपंच मारुती आघान, उपसरपंच गणेश गायकर, शेनवडचे उपसरपंच कैलास कडू आदींनी केली आहे.