..तर नाशिकच्या आमदारांना धडा शिकवू- मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सर्व आमदारांनी या विषयांवर जोरदार आवाज उठवून मराठा समाजाला न्याय द्यावा, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदारांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.

सिडको :  मराठा आरक्षण मागण्यासंदर्भात सभागृहात आमदारांनी आवाज न ऊठवल्यास त्या आमदारांना पुढील निवडणूक काळात मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे सर्व आमदारांनी या विषयांवर जोरदार आवाज उठवून मराठा समाजाला न्याय द्यावा, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आमदारांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या झालेल्या बैठकीप्रमाणे आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.राहुल आहेर, आ.राहुल ढिकले, आ.सुहास कांदे यांना मराठा आरक्षण प्रश्नावरती येत्या विधिमंडळ अधिवेशनात आक्रमकपणे प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण व इतर सर्व मागण्यांबाबत व आझाद मैदान येथे नियुक्तीच्या प्रतीक्षेत बसलेल्या मराठा उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याबाबत नोंद केली आहे.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर ९  तारखेला सुनावणी झाली. ही स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून येत्या २५ जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या सद्यस्थिती आणि मागण्यांबाबत आगामी अधिवेशनात योग्य आवाज उठवावा आणि न्याय मिळावा ही विनंती केली आहे. यावेळी निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, सुनील बागुल, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, योगेश गांगुर्डे, किरण बोरसे, शिवा गुंजाळ, भारत पिंगळे, वैभव दळवी आदी उपस्थित होते.