अवैध वाळू उपशाविरुद्ध गिरणा नदीत ठिय्या आंदोलन

वाळूने भरलेले ट्रॅक्टर कांदा पिकांत चालवून संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना ताजी असतांना शेतात पाणीपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची पाईपलाईन तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांसह लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्रात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

  देवळा : गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने, लोहोणेर आणि ठेंगोडा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गिरणा नदीत वाळू उपसामुळे झालेल्या खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी सटाणा व देवळा तालुका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

  वाळूमाफियांना संरक्षण
  गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे. या बाबत लोहोणेर-ठेंगोडा येथील स्थानिकांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील सटाणा अथवा देवळा तालुक्याच्या प्रशासनाने वाळू माफियांवर कुठलीही कारवाई केली नाही. प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे वाळू माफियांवर कडक कारवाई न होता वाळू माफियांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले.

  प्रशासनाचा निषेध
  वाळूने भरलेले ट्रॅक्टर कांदा पिकांत चालवून संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना ताजी असतांना शेतात पाणीपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची पाईपलाईन तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांसह लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्रात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

  यांची उपस्थिती
  यावेळी लोहोणेर ग्रामपंचायतीचे सदस्य सतिष सोमवंशी, रतिलाल परदेशी, धाेंडू आहिरे, चंद्रकांत शेवाळे, निंबा धामणे, दिलीप भालेराव, दीपक बच्छाव, रमेश आहिरे, योगेश पवार, मच्छिंद्र बागुल, हिरामण बागुल, प्रल्हाद बागूल, रामदास उशिरे, पोलिस पाटील अरुण उशिरे, ठेंगोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण निकम, ग्रा. प. सदस्य रवींद्र मोरे, तुळशीदास शिंदे, मा. पो. पाटील कचरुदास बागडे, मा. उपसरपंच प्रकाश बागूल आदी उपस्थित होते.

  चाेरट्या वाळूमुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आमचे आर्थिक नुकसान होत असते. त्यांची भरपाई कोण करून देणार? अवैद्य वाळू उपशाबाबत जे अधिकारी जबाबदार आहेत; अशा अधिकाऱ्यांची जबाबदारी निच्छीत करून लोहोणेर-ठेंगोडा मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी यांनाही निलंबित करावे.

  - बापू बागूल, शेतकरी, लोहोणेर