मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या बसला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान
मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या बसला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे जवान

चांदवड (Chandwad) :  नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai- Agra Highway) राहुड शिवारात मालेगाव आगाराच्या बसने शनिवारी दुपारी अचानक पेट घेतला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ येथील सोमा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली.

या बसमध्ये एकूण २० प्रवाशी बसले होते, बसला आग लागताच चालकांच्या समय सूचकतेमुळे बस महामार्गाच्या कडेला उभी करून प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात एक वयोवृद्ध आजीचे सामान आगीत जळून राख झाले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस हवालदार विजय जाधव, मुज्जमिल देशमुख, मंगेश डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली. यामुळे या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी बसचे आणि प्रवाशांच्या सामानांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.