नाशिक शहरात कडकडीत बंद; बससेवेवर परिणाम

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच बंद बाबतची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला लिलावासाठी आणला नाही त्यामुळे या ठिकाणी लिलाव झाले नाही जिल्ह्यातील इतर बाजार समितीत बरोबरच नाशिक कृउबादेखील १००% बंदमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  नाशिक : लखीमपूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये सुरुवात झाली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी म्हणून प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बंदमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर बससेवेवर परिणाम झाला आहे.

  बससेवेवर परिणाम
  उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या आणि अन्य घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आज सोमवारी या बंदला नाशिकमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी म्हणून प्रशासनाने तयारी केली अाहे. बससेवेलाही नागरिकांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. या बंदमध्ये काँग्रेस प्रणित इंटकचे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे हे राज्य परिवहन महामंडळाचे कामकाजवरही काही प्रमाणात परिणाम झाला.

  औद्याेगिक वसाहतीत शांतता
  महाविकास आघाडीने पुकारलेल्या या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या घटक पक्षांबरोबरच माकपा, भाकपा, किसान मोर्चा यांनीदेखील या पाठिंबा दिल्यामुळे त्याचा परिणाम अधिक दिसून आला. शहरातील सातपूर, अंबड तसेच जिल्ह्यातील गोंदे, इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी या औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची संख्याही कमी प्रमाणात होती. परंतु औद्योगिक वसाहत मात्र चालू होती.

  जिल्ह्यात भाजीपाला लिलाव नाही
  जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, चांदवड, सटाणा, पिंपळगाव बसवंत, निफाड, येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी झाल्यामुळे भाजीपाला व अन्य लिलाव होऊ शकले नाही. यात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका आणि बोलणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे लिलाव न केल्यामुळे येथून गुजरात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह मध्यप्रदेश व देशाच्या वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये जाणारा माल हा जाऊ शकला नाही.

  कृउबात शुकशुकाट
  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच बंद बाबतची कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला लिलावासाठी आणला नाही त्यामुळे या ठिकाणी लिलाव झाले नाही जिल्ह्यातील इतर बाजार समितीत बरोबरच नाशिक कृउबादेखील १००% बंदमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  सिटीलींक थंडावली
  मध्यरात्रीपासूनच बंदला सुरुवात झाल्यानंतर शहरात पेट्रोल पंप, दूध, मेडिकल दुकानेवगळता इतर सर्व सेवा या सकाळच्या सत्रात बंद होत्या तर नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेची सिटीलींकची बस सेवा देखील संथगतीने सुरू होती. परिस्थितीची एकूण आढावा घेऊन सिटीलींक सेवा ही सकाळी सुरू करण्यात आली; परंतु यामध्ये एकूणच परिस्थितीचा आढावा घेत अतिशय धिम्या गतीने ही सेवा सुरू हाेती.

  या भागात बंद
  शहरातील रविवार कारंजा, धुमाळ पॉईंट, भद्रकाली बाजार तसेच सिडकोतील पवन नगर, त्रिमूर्ती चौक, उत्तम नगर चौक, इंदिरा नगर, सातपूर गावातील चौक वगळता इतर अन्य ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेते किंवा किरकोळ विक्रेत्यांनी देखील दुकाने लावली नाही. मात्र या चौकांमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी चौकांमध्ये दुकाने लावून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली हाेती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  भावना भडकाऊ नका : भुजबळ
  याबाबत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये बंदला चांगला प्रतिसाद आहे. राज्यामध्ये बंदला व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की काही अपवादात्मक परिस्थिती बघता आणि काही घटना बघता बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल नागरिकांचं समाधान व्यक्त केले ते पुढे म्हणाले की, या प्रतिसादाने नागरिकांमध्ये असंतोष समोर येत आहे का बंद फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे.त्यामुळे उगाच भावना भडकवण्यासाठी कोणीही काहीही चुकीचे वक्तव्य करू नये, असा सल्ला त्यांनी विरोधी पक्षाला दिला.