कोरोना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची शक्कल, बाजारपेठेत खरेदीसाठी एका तासाला मोजावे लागणार पाच रुपये

बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयोग शहरातील मुख्य  बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

    नाशिक: वाढती कोरोना रुग्नांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता पोलीस प्रसाशन सरसावले आहे. बाजारपेठामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने एका तासाला ग्राहकांना पाच रुपये आकारण्यात येणार असल्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.  बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयोग शहरातील मुख्य बाजारपेठांसह विविध उपनगरांमधील बाजारांमध्ये पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

    मेनरोड, शिवाजीरोड येथील मुख्य बाजारपेठेकडे जाणारे महत्वाचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करत बंद केले आहेत.  या भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाच रुपयांची पावती मनपा कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे.  शहरात शिवाजीरोड, मेनरोड, गाडगेमहाराज पुतळा ते सरस्वती चौकापर्यंत खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी उसळते.
    दिवसभर या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून येते.

    यामुळे या गर्दीवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी या बाजारपेठेकडे येणारे प्रमुख रस्ते पोलिसांनी सोमवारी बॅरिकेड टाकून बंद केले. बादशाही कॉर्नर, नवापुरा गल्ली, धुमाळ पाइँट, सेंट थॉमस चर्च कॉर्नर, वावरे गल्ली, या ठिकाणांहून नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रत्येक पॉइंटवर मनपा कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीही दोन सत्रांत बंदोबस्तासाठी तैनात राहणार असून राज्य पोलीस कायदा कलम-४३ अनुसार गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अशाप्रकारचा प्रयोग शहरात राबविला जात असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.