वाहतूकदार-अधिकाऱ्यांची बैठक निष्फळ

तिसऱ्या दिवशीही ताेडगा नाही

मनमाड : इंडियन ऑइल कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील अधिकारी आणि वाहतूकदारांच्या झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे वाहतूकदारांचा संप तिसऱ्या दिवशी ही सुरूच आहे. प्रकल्पातील अधिकारी मनमानी करतात, असा आरोप करत गॅस सिलिंडर वाहतूकदारांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या संपामुळे प्रकल्पातून राज्यातील विविध भागात केला जाणारा सिलिंडर पुरवठा ठप्प झाला आहे.संप जास्त दिवस चालल्यास अनेक भागात गॅस सिलिंडर टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मनमाडपासून ७ किमी अंतरावर पानेवाडी-धोटाणे परिसरात इंडियन ऑइल कंपनीचा गॅस प्रकल्प आहे. या प्रकल्पातून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत सुमारे ५५ ट्रकच्या माध्यमातून गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो एका ट्रक ३५० सिलिंडर असतात. त्यामुळे या प्रकल्पातून रोज १८ हजार, ५०० सिलिंडर पुरवठा होतो. सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी कंपनीकडून निविदा मागवली जाते.

शहर परिसरातील वाहतूकदार गेल्या अनेक वर्षांपासून गॅस सिलिंडर वाहतूक करण्याचे काम करीत आहे. मात्र प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी कारभार करून अपमानास्पद वागणूक देत असतात. तसेच स्थानिकऐवजी बाहेरच्या वाहतूकदारांना सिलिंडर वाहतूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांनी करून शनिवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. आम्ही अनेक वर्षांपासून प्रकल्पातून सिलिंडर वाहतुकीचे काम करत असताना आम्हाला डावलून बाहेरच्या वाहतूकदारांचा विचार केला जात आहे, हा आमच्यावर मोठा अन्याय असल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. रविवारी सायंकाळी कंपनीचे अधिकारी आणि नाना पाटील, संजय पांडे, कांती लुणावात, संजय चोपडा यासह इतर वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनी यांची बैठक झाली. मात्र त्यात कोणताही समाधानकारक तोडगा निघाली नसल्याने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतल्याची माहिती नाना पाटील यांनी दिली.