Kanda-Utpadak-Shetkari-aandolan

लासलगाव : आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद राहिल्याने 5 कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.

लासलगाव : आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद राहिल्याने 5 कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे. तर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने साठ ते सत्तर कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ही अघोषित कांदा लिलाव बंदी जास्त दिवस राहिल्यास कांदा उत्पादकांना फटका बसेल आणि देशांतर्गत पुन्हा कांद्याच्या बाजारभावात भडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे.

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या उन्हाळ कांद्याच्या हंगामातील आठ हजार रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने केंद्र सरकारने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी अगोदर निर्यातबंदी, प्राप्तिकर विभागाचे व्यापाऱ्यांवर छापे, कांदा आयात करणे इत्यादी उपाय योजना केल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची साठवणुकीवर मर्यादा घालत घाऊक व्यापार्‍यांना 25 टनांपर्यंत तर किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनांपर्यंत मर्यादा घालून दिल्याने कांदा व्यापार्‍यांना व्यापार करणे अडचणीचे झाल्यामुळे कांद्याच्या लिलावात सहभागी होण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये ठप्प झाले आहे. गजबजलेल्या बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे शुकशुकाट दिसत आहे

यंदाच्या पावसाळी हंगामात जास्त दिवस पावसाचे मुक्काम राहिल्याने दमट वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे तर नवीन लाल कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेले आहे. केंद्र सरकारच्या विविध निर्बंधामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असताना कांदा उत्पादकांना दिलासा मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सणासुदीच्या काळात कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे बाजार भावात आणखी घसरण होत कांदा उत्पादकांना मिळणाऱ्या बाजारभावानुसार कोट्यवधींचा फटका बसला.