नगरसेवक राहुल पाटील अन् हर्षदा सूर्यवंशी यांचा अनोखा विवाह सोहळा

सटाणा : युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक राहुल पाटील आणि धांद्री येथील हर्षदा सूर्यवंशी यांचा विवाह खुप आधीच ठरला होता. मात्र ''कोरोना'' लॉकडाऊनमुळे रद्द झाल्यात जमा होता. त्यांनी नाऊमेद न होता कोणत्याही पै पाहुण्यांच्या उपस्थितीशिवाय घरातच लग्न केले.

 सटाणा : युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक राहुल पाटील आणि धांद्री येथील हर्षदा सूर्यवंशी यांचा विवाह खुप आधीच ठरला होता. मात्र ‘कोरोना’ लॉकडाऊनमुळे रद्द झाल्यात जमा होता. त्यांनी नाऊमेद न होता कोणत्याही पै पाहुण्यांच्या उपस्थितीशिवाय घरातच लग्न केले. ते फेसबुक लाईव्ह केले. त्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांसह अनेक नेते, तब्बल पंच्चावन्न हजारांनी साक्षीदार होत ऑनलाईन अक्षता टाकल्या. 

छत्रपती शाहू महाराजांपासून महाराष्ट्राची परंपरा असलेल्या अनेक संतांनी साधे रहा, विवाह समारंभात उधळपट्टी टाळा असा संदेश दिला. महात्मा फुले यांच्या सत्याशोधक समाजात तर फक्त वधु वरांनी एकमेकांना हार घाला अन्‌ विवाह झाला असे प्रत्यक्ष उदाहरणांतून दाखवून दिले. जे या विभूतींनी सांगीतले, ते ‘कोरोना’ने समाजाला जगण्यास भाग पाडले आहे. त्याला फेसबुक सारखे तंत्र मदतीला आले तर, कोणाच्याही उपस्थितीशिवाय मात्र हजारोंच्या साक्षीने किती आनंददायी विवाह होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे, सटाणा पालिकेचे निवृत्त वसुली निरीक्षक सुभाष पाटील यांचे पुत्र कॉंग्रसचे नगरसेवक राहुल पाटील आणि ठाणे येथे झोडिएॅक कंपनीत फार्मासीस्ट असलेल्या, धांद्री (मालेगाव) येथील ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांची कन्या हर्षदा सूर्यवंशी यांचा विवाह. 
पाटील यांच्या घरातील हा शेवटचा तर श्री. सूर्यवंशी यांच्या घरातील पहिलाच विवाह असल्याने तो धुमधडाक्‍यातच करावा असे सांगणारेही अनेक नातेवाईक होते. पण त्यांनी कोणाचेही न ऐकता कोरोनामुळे लांबणीवर पडलेला विवाह साधेपणाने केला. वर राहुल यांना फेसबुक लाइव्हची संकल्पना सुचली. दोन्हीकडील नातेवाइकांनी त्यास संमती दिली. पाहुणे आणि मित्रमंडळींना ऑनलाइन राहण्यास सांगितले. मंगळवारी अवघ्या २४ सदस्यांच्या उपस्थितीत निवासस्थानीच हा विवाह झाला. त्याआधी साखरपुडा झाला. 
वधू हर्षदा औषधनिर्माण शाखेतील उच्चशिक्षित आहे. साखरपुड्यावेळी हर्षदाने पांढरा अॅप्रन, तर वर राहुलने खाकी रंगाचा शर्ट आणि मास्क परिधान केला होता. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जीव गमावलेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस बांधवांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पाटील आणि सूर्यवंशी परिवाराने आहेर स्वरूपात रक्कम न स्वीकारता ‘आपण घरीच राहा, सुरक्षित राहा, हाच आमचा आहेर आहे,’ असा संदेशही दिला.
महसुलमंत्री थोरात, गृहराज्य मंत्री सतेज (बंटी) पाटील, आमदार सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार कुणाल पाटील, राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार राहुल आहेर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, युवानेते अजय दराडे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांसह अनेकांनी वधू-वरास आॅनलाईन शुभेच्छा दिल्या.