लासलगावी तज्ञ नसल्याने व्हेंटीलेटर पडून

लासलगाव : व्हेंटीलेटर मिळावेत म्हणून हाॅसि्पटलचालक रात्रीचा दिवस करत आहेत. लासलगावी मात्र वेगळाच प्रकार उघड झाला आहे. येथे व्हेंटीलेटर आहेत मात्र त्यासाठी सक्षम कर्मचारी नसल्याने हे व्हेंटीलेटर धूळखात पडून आहेत. हे व्हेंटीलेटर त्वरित सुरू केले नाही तर तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

निफाड तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, तीन हजार रुग्णांचा टप्पा पारा केले आहे. गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार घेणे अश्यक्य असल्याने शासकीय रुग्णालयात उपचार मिळावे, यासाठी राज्यनंतर केंद्र शासनाकडून लासलगाव कोविड सेंटरला देण्यात आलेले सात व्हेंटिलेटर फिजिशन तज्ञ नसल्याने धूळखात पडून आहे. व्हेंटिलेटर त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

देशात कोरोना विषाणूंचे थैमान सुरू असून नाशिकनंतर निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबधितांना वेळेत व्हेंटिलेटर न मिळू शकल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची जीव जाऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून चार व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र फिजिशियन तज्ञ नसल्याचे कारण देत चारही व्हेंटिलेटर पिंपळगाव येथील नव्याने सुरू झालेल्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर लासलगावकरांनी संताप व्यक्त केल्याने केंद्र सरकारकडून सात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. पण फिजिशियन तज्ञ नसल्याने हे सातही व्हेंटिलेटर बंद खोलीत धूळखात पडून आहे. त्वरित फिजिशियन तज्ञ उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचेेेे नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी मार्चमध्ये लासलगाव येथे कोविड सेंटर कार्यन्वित करण्यात आले. अातापर्यंत चारशेहून अधिक रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहे. यातील ६० रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले होते. याची दखल घेऊन शासनाकडून सात व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र फिजिशियन तज्ञ नसल्याने अद्याप व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात जरी आले नसले तरी फिजिशियन तज्ञ मिळावे यासाठी आरोग्य विभाग व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच उपलब्ध होती आणि व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सतीश सूर्यवंशी यांनी सांगितले.