कचरा ठेका प्रकरणात आयुक्तांचा वेळकाढूपणा ; महापौर शेख यांचा आरोप

मालेगाव : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या खासगी ठेकेदार विरोधात सातत्याने होणाऱ्या तक्रारीमुळे महापालिका सभागृहात ठेका रद्द करण्याचा ठराव केला असताना देखील स्थायी समितीने सदर ठेक्यास १० वर्षांची मुदत वाढ दिल्याची धक्कादायक बाब महापौर ताहेरा शेख व माजी महापौर रशिद शेख यांनी उघडकीस आणली होती. सदर ठराव रद्द करण्या संदर्भात आयुक्त त्रंबक कासार यांनी शासनास प्रस्ताव पाठवला आहे. मात्र स्थायी समितीने ठेका मुदत वाढीचे दोन ठराव केले असून यातील एकच ठराव आयुक्तांनी विखंडित करण्यासाठी शासनास पाठवला आहे. एकच ठराव विखंडित करण्यासाठी पाठविण्यामागे आयुक्तांचा हेतू काय ? असा प्रश्न आजी माजी महापौर उपस्थित केला आहे.

सोमवारी ( दि ०५ ) महापौर ताहेरा शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमहापौर निलेश आहेर देखील उपस्थित होते. मालेगाव शहरातील कचरा संकलन करण्यासाठी वॉटर ग्रेस या खासगी कंपनीला १० वर्षांच्या मुदतीने ठेका देण्यात आला आहे. सदर ठेकेदार विरोधात सातत्याने येणाऱ्या तक्रारी मुळे सदर ठेका रद्द करण्याचा ठराव महासभेने केला असताना देखील स्थायी समितीने २८ नोव्हेंबर २०१९ व ३१ जुलै २०२० रोजी ठेकेदाराच्या ठेका मुदतीस ३ वर्षांचा कालावधी बाकी असताना देखील परस्पर मुदत वाढ दिली आहे. यासंदर्भात महापौर शेख यांनी सदर प्रकार उघडकीस आणला होता. आयुक्त कासार यांनी स्थायी समितीचा दि. ३१ जुलै २०२० चा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असाल तरी अशाच प्रकारचा ठराव २८ नोव्हेबर २०१९ रोजी करण्यात आला होता. तो ठराव देखील विखंडीत करण्यासाठी आयुक्तांनी शासनास का पाठवला नाही? असा सवाल महापौर ताहेरा शेख व माजी महापौर विद्यमान नगरसेवक रशीद शेख यांनी उपस्थित केला आहे. ठेकेदारास मुदतवाढ देणारे दोन्ही ठराव विखंडीत करण्यासाठी आयुक्तांनी शासनाकडे पाठवणे अपेक्षित असतांना केवळ एकच ठराव विखंडीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्यामागे आयुक्तांचा हेतू काय ? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच माजी महापौर रशीद शेख म्हणाले की, ठेका रद्द करण्याबाबत महासभेने आधीच ठराव केलेला असून त्यावर कारवाई करणे अपेक्षित असतांना सदर ठेकेदारास अंतिम नोटीस बजावून आयुक्त वेळकाढूपणा करीत आहेत, असा देखील आरोप शेख यांनी यावेळी केला.

वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या आयुक्तांवर अविश्वास ठराव देखील आणणार असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले. यासाठी सभागृहात अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरु असून याबाबत सर्व पक्षीय गटनेत्यांशी चर्चा झाली आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांचा देखील आम्हाला पाठिंबा राहणार असल्याचा दावा यावेळी शेख यांनी केला आहे.