येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची अंधश्रद्धेला मूठमाती ; ६४ वर्षांनंतर अमावस्येला होणार लिलाव

बाजार समितीची स्थापना १९५५ रोजी झाली अाहे. प्रत्यक्ष कामकाज १९५७ मध्ये सुरु झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत दर अमावास्येला बाजार समितीत कांदा, मका व भुसाराान्याचे लिलाव बंद राहत होते.

  येवला : अमावस्या असली की, लिलाव बंद ही गेल्या ६४ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा येत्या अमावास्येपासून मोडीत निघणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने ही प्रथा मोडीत काढली असून, शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. बाजार समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे लिलावासाठी बारा दिवस जास्त मिळणार यातून २ ते ३ लाख क्विंटल कांद्याची खरेदी वाढणार. यामुळे आता असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांनी दिली आहे.
  ग्रामीण भागात अमावस्येचा दिवस अशुभ मानला जायचा. शेतीची कामे केली जात नव्हती; किंबहूना शेतकरी बैलांच्या खांद्यावर कुठलेही साहित्य ठेवत नसायचे. त्यामुळे अमावस्या असली की, बाजार समितीत बैलगाडीतून शेतमाल विक्रीला येतच नसायचा, त्यातूनच अमावस्याला लिलाव बंदची संकल्पना पुढे आल्याचे सांगितले जाते. पुढे बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टर व रिक्षा या साधनांनी घेतली परंतु बंदची प्रथा मात्र कायमच राहिली होती. या निर्णयावर जिल्हाभर अनेकदा टिकाही झाली.

  या सर्व पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसह व्यापारीही अमावस्याला शुभ-अशुभ असे मानत नसल्याने शेतकरी हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील कृउबातील सर्व परवानारक, खरेदीदार व्यापारी यांची मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव कैलास व्यापारे यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

  बाजार समितीची स्थापना १९५५ रोजी झाली अाहे. प्रत्यक्ष कामकाज १९५७ मध्ये सुरु झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत दर अमावास्येला बाजार समितीत कांदा, मका व भुसाराान्याचे लिलाव बंद राहत होते. परंतु शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेवून व शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करुन बाजार समितीने मागील ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून यापुढे प्रत्येक अमावास्येला इतर बाजार समित्यांप्रमाणे शेतमाल लिलाव चालू ठेवण्याबाबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

  या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अमावास्येच्या दिवशी शेतमाल विक्रीची अडचण दूर होणार असून, या दिवशीही कांदा व इतर भुसार धान्य विक्री करता येणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज व्हावे, याकरीता प्रयत्न करण्यात येत असून, अमावास्येचे दिवशी लिलाव चालू राहणार असल्याने वर्षात बारा दिवस वाढीव होणार असल्यामुळे २ ते ३ लाख क्विंटल कांदा विक्री वाढणार असल्याचा विश्वास सचिव व्यापारे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात झालेल्या बैठकीस मुख्य प्रशासक वसंत पवार, प्रशासक भानुदास जाधव,सचिव के. आर. व्यापारे, नंदकिशोर आट्टल, व्यापारी सुमित समदडीया, जयेश ठाकूर, योगेश सोनी, प्रणव समदडीया, शंकर कदम, अर्शद शेख आदी उपस्थित होते. या निर्णयाचे शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनामधून देखील स्वागत होत आहे.

  ६४ वर्षांपासून अमावस्येच्या दिवशी लिलाव बंदची सुरू असलेली परंपरा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार बंद करण्यात आली अाहे. यापुढे अमावास्येला लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. यापुढे नियमितपणे अमावस्येलाही लिलाव सुरू राहतील, शेतकऱ्यांची वर्षंनूवर्षाची मागणी पूर्ण करता आल्याचा आनंददेखील आहे.

  - वसंतराव पवार, मुख्य प्रशासक, बाजार समिती

  “येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने अमावास्येच्या दिवशी लिलाव सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय अाहे. शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी अमावास्येची अडचण येणार नाही. अंधश्रद्धायुक्त प्रथा मोडीत काढल्याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ प्रशासक मंडळ व व्यापारी बांधवांचे आभार.”
  – बापूसाहेब शेलार, शेतकरी

  “बाजार समिती आवारात होणारी कांद्याची वाढती आवक पहाता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार बाजार समिती प्रशासक मंडळ व व्यापारी संघटना यांची बैठक होऊन जुन्या अंधश्रद्धा वाढीस लावणाऱ्या प्रथा परंपरा मोडीत काढण्यासाठी अमावस्येच्या दिवशीही लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व्यापारी शेतकरी मजुरवर्ग या सर्वांच्या हिताचा हा निर्णय असून आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असल्याचे हे द्योतक आहे.”
  – नंदकिशोर अट्टल, व्यापारी प्रतिनिधी, कृउबा