येवल्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई बावीस हजारापेक्षा जास्तीचा दंड वसूल

विना मास्क फिरणाऱ्या सुमारे १२५ नागरिकांवर येवला शहरात कारवाई करण्यात आली असून २२ हजार रुपयांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

    येवला :  येवला शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून या विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विना मास्क फिरणाऱ्या सुमारे १२५ नागरिकांवर येवला शहरात कारवाई करण्यात आली असून २२ हजार रुपयांपेक्षा जास्तीचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून नागरिकांनी विना मास्क घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. येवला शहरात महसुल, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.विंचूर चौफुलीवरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसचीही तपासणी करण्यात येऊन विना मास्क प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले शहरासह तालुक्यात कोरोना आटोक्यात असला तरी प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येवला शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने, विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिका मुख्याधिकारी संगिता नांदुरकर, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह कर्मचाऱ्याचे पथक कारवाई करत असून पहिल्याच दिवशी तब्बल १२५ पेक्षा अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

    सदर मोहीम यापुढेही सुरू राहणार असून शहर व तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोना संसर्गापासून बचाव करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.