तीर्थक्षेत्र नेरपिंगळाई देवी गड

मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड यांचे चक्र आहे. फार पूर्वी मंदिराच्या राजाचे पोट दुखायला लागले. तेव्हा पुजाऱ्याने देवीची आराधना केली आणि अंगारा लावला तेव्हा राजाचे दुखणे बरे झाले. त्या वेळी राजाने देवी मंदिरात सभामंडप बांधून दिल्याचा इतिहास आहे.

    मोर्शी तालुक्यातील (Morshi taluka) नेरपिंगळाई देवी गडाला विदर्भाचे (Vidarbha) तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या देवस्थानाच्या ठिकाणी नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी होते. दु:खहरण करून मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून पिंगळादेवीची ख्याती आहे. नवरात्रात दहा दिवस या मंदिरात प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. अमरावती ते मोर्शी रस्त्यावर गोराळा या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर देवीचा हा ऐतिहासिक गड आहे. चैत्र आणि अश्विन महिन्यांत या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

    ऐतिहासिक महत्त्व
    देवी मंदिर आणि सभोवतालचा गाभारा हा हेमाडपंती बांधणीचा आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. पिंगळाई देवीचा हा गड प्राचीन असून, सुमारे सहाशे वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झाल्याचा इतिहास आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड यांचे चक्र आहे. फार पूर्वी मंदिराच्या राजाचे पोट दुखायला लागले. तेव्हा पुजाऱ्याने देवीची आराधना केली आणि अंगारा लावला तेव्हा राजाचे दुखणे बरे झाले. त्या वेळी राजाने देवी मंदिरात सभामंडप बांधून दिल्याचा इतिहास आहे. मंदिराच्या प्रवेशाद्वारासमोरच दीपस्तंभ आहे. या स्तंभाला ‘निग्नेशिक सर्व्हे स्टँड’ म्हणतात. येथून दूरदूरच्या प्रदेशाची टेहळणी केली जात होती.

    तीन प्रहरी तीन रूपे
    देवीचा चेहरा पूर्वाभिमुखी आहे. तेजस्वी डोळे, उंच कपाळावर मोठे कुमकुम तिलक आणि हिरवे वस्त्र परिधान केलेले देवीचे रूप बघून भक्तांच्या चिंता दूर होतात. सकाळी बाल रूप, दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी वृद्धरूप, असे तीन रूप देवीचे दिसतात.