मांत्रिकांची माता बगलामुखी : युधिष्ठिराने शत्रूनाशकरिता स्मशानभूमीत उभारले होते देवीचे मंदिर

मातेची मूर्ती स्वयंभू आहे व स्वत: महाराज युधिष्ठिर यांनी मंदिराची स्थापना केली आहे. मंदिरात बेलपत्र, चमेली, आवळा, लिंब व पिंपळाचे झाड आहे. मंदिर परिसरात सुंदर बगिचा आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते.

  तीनमुखी त्रिशक्ति बगलामुखी देवीचे मंदिर मध्य प्रदेशातील नलखेडे येथे लखुंदर नदीच्या काठी स्थित आहे. द्वापार युगातील हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते. त्यामुळे देशभरातील तांत्रिक-मांत्रिक, साधू-संत अनुष्ठान करण्यासाठी येथे येत असतात. मंदिरात बगलामुखी देवीव्यतिरिक्त लक्ष्मी, श्रीकृष्ण, हनुमान, भैरवनाथ व सरस्वतीच्या मुर्ती येथे आहेत. महाभारतात विजय मिळविल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने महाराज युधि‍ष्ठिर यांनी या मंदिराची स्थापना केली होती.

  बगलामुखी देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची देखील आख्यायिका आहे. मंदिराचे पुजारी कैलाश नारायण शर्मा यांनी सांगितले की, बगलामुखी मातेचे हे फार प्राचीन मंदिर आहे. दहा पिढ्यांपासून येथे शर्मा पुजापाठ करत आहेत. 1815 साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात.

  येथील पुजारी गोपालजी पंडा, मनोहरलाल पंडा आदींनी सांगितले, की हे मंदिर स्मशानभूमीत आहे. बगलामु्‍खी देवी मुळात तांत्रिक, मांत्रिकांची देवी आहे. त्यामुळे येथे तांत्रिक अनुष्ठानाला अधिक महत्त्व आहे. संपूर्ण विश्वात मातेची तीन मंदिरे आहेत परंतु, येथील मंदिराचे महत्त्व काही वेगळे आहे. कारण येथील मातेची मूर्ती स्वयंभू आहे व स्वत: महाराज युधिष्ठिर यांनी मंदिराची स्थापना केली आहे. मंदिरात बेलपत्र, चमेली, आवळा, लिंब व पिंपळाचे झाड आहे. मंदिर परिसरात सुंदर बगिचा आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. परंतु, मंदिर स्मशानभूमीत असल्याने येथे वर्षभर कमीच भक्त दिसतात.

  कसे पोहचाल ?
  हवाई मार्ग : नलखेडे येथे जाण्यासाठी सर्वांत जवळ इंदूर येथे विमानतळ आहे.
  रेल्वे मार्ग- इंदूर येथे रेल्वे स्थानक आहे. येथून देवास किंवा उज्जैन येथे जाण्यासाठी रेल्वे गाडी मिळते. देवास किंवा उज्जैन येथून शाजापुर जिल्ह्यातील नलखेडे येथे बस किंवा खाजगी वाहनाने जाता येते.