उपवासाच्या दिवशी काही चमचमीत खावस वाटतंय? मग उपास स्पेशल मिसळ नक्की ट्राय करा

    साहित्य :

    खिचडीसाठी :

    १ वाटी भिजवलेला साबुदाणा
    १/२ वाटी दाण्याचे कुट
    १ बटाटा पातळ चिरुन
    मिठ
    साखर
    हिरवी मिरची ठेचा
    १/२ चमचा किसलेले आले

    बटाटा भाजीसाठी :
    ३/४ उकडलेले बटाटे
    ३ चमचे दाण्याचे कुट
    मिठ
    साखर
    आले मिरची वाटण
    जिरे

    दाण्याची आमटीसाठी :
    १/२ वाटी उकडलेले शेंगदाणे
    १/२ वाटी दाण्याचे कुट
    २ आमसुले
    साखर
    २ चमचे ओले खोबरे
    २ हिरव्या मिरच्या
    आले
    मिठ
    इतर साहित्य
    बटाटा चिवडा किंवा सळी
    ओला नारळ खरवडुन
    कोथींबीर
    काकडी बारीक चिरुन
    फोडणी साठी तेल किंवा तुप

    कृती :

    साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी प्रथम भिजवलेल्या साबूदाण्याला दाण्याचे कुट, मिठ, साखर, हिरवी मीरची वाटण लावुन घ्यावे.
    नंतर तेलाची किंवा तुपाची फोडणी करुन त्यात बटाटा आणि आले घालुन छान परतुन एक वाफ द्यावी. बटाटा थोडा शिजला की साबुदाणा घालुन ढवळुन ढवळुन खिचडी करावी नंतर वरुन खोबरे आणि कोथींबीर घालावी.

    बटाटा भाजी करताना उकडलेले बटाटे थोडे मोडुन घ्यावेत त्यात मिठ साखर हिरवे वाटण घालुन घ्यावे. तेलावर किंवा तुपावर जिर्याची फोडणी करुन बटाटे घालुन परतुन वाफ देऊन भाजी तयार करावी. तसेच वरुन थोडी कोथींबीर घालावी.

    दाण्याची आमटी करताना दाण्यचे कुट,नारळ, मिठ, साखर, मीरची, आले एकत्र करुन थोडेसे पाणी घालुन मिक्सरला लावुन पेस्ट करुन घ्यावी. नंतर तेलाची किंवा तुपाची फोडणी करुन त्यात प्रथम उकडलेले शेंगदाणे घालुन परतुन घ्यावेत. नंतर त्यात वाटलेली पेस्ट घालुन परतावे. मग लागेल तसे गरम पाणी घालुन एक सारखे करावे. त्यात आमचुल पावडर घालुन छान उकळी काढावी.

    मिसळ खायला देताना प्रथम बटाटा चिवडा घालावा त्यावर बटाटा भाजी, दाण्याची आमटी घालावी आणि त्यावरून चिरलेली काकडी, कोथींबीर, लिंबु घालून मिसळ सर्व्ह करावी.