Special interview of Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray on the occasion of Nitin Gadkari's birthday

१९९५ साली युतीच्या सरकारमध्ये नितीन गडकरी यांची ओळख ‘पूलकरी’ अशी होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नितीनजींवर बाळासाहेबांचं विशेष प्रेम होते आणि ते कधी लपून राहिले नाही. शिवसेनाप्रमुखांविषयी देखील त्यांना आदर होता आणि आजही आहे. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. पण ही सगळी दबदबा असलेली मंडळी घरी यायची, त्यांना जवळून पाहण्याची आणि बोलण्याची संधी मी सोडत नसे.

  एक गोष्ट सांगतो की, नितीन गडकरी यांच्यात माणुसकी आहे. कुठलेही विकास आणि प्रगतीचे काम करताना त्या कामाचा सर्वसामान्य जनतेला कसा उपयोग होईल, प्रकल्पामुळे जे बाधित होताहेत त्यांच्या लाभाचे काय याचाही अतिशय बारकाईने विचार ते करतात.

  मध्यंतरी कोरोनातून बरे झाल्यावर गडकरी यांनी पोस्ट कोविडमध्ये कशी काळजी घ्यावी. तसेच योग्य श्वसन करून कसे आरोग्यदायी राहावे अशा विषयावर मी त्यांचे यूट्यूब व्हिडीओ पाहिले. लाखो फॉलोअर्स आज त्यांना मिळाले आहेत. कोरोनाशी लढा देत आपण एकटेच बरे होऊत असा विचार न करता या संकटाला त्यांनी संधीत बदलले. हे फक्त सकारात्मक ऊर्जा असलेला माणूसच करू शकतो.

  केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘नवराष्ट्र’ यांनी विशेषांक प्रसिद्ध करून एका धडाडीच्या नेत्याचा सन्मान केला आहे. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो.

  नितीन गडकरी यांना आपण भेटल्यानंतर त्यांच्या बरोबरचा प्रत्येक क्षण हा कारणी लागल्याचे समाधान मिळते. एखाद्या मंत्र्याला त्याच्या विषयातले ज्ञान आपण समजू शकतो. पण गडकरीजी एकाचवेळी अनेक विषयांवर इतके सखोल बोलू लागतात की, आपण चकित होऊन जातो. केवळ विकास आणि प्रगतीच्या गप्पा ते मारत नाहीत, तर त्यात नेमके काय अडथळे आहेत, ते कसे दूर केले पाहिजेत आणि अडचणींवर मार्ग काढण्यासाठी खास क्लुप्ती कशी आणि कधी वापरायची हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. आणि म्हणूनच त्यांना ‘टास्क मास्टर’ म्हटले जाते ते काही खोटे नाही.

  १९९५ साली युतीच्या सरकारमध्ये नितीन गडकरी यांची ओळख ‘पूलकरी’ अशी होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या नितीनजींवर बाळासाहेबांचं विशेष प्रेम होते आणि ते कधी लपून राहिले नाही. शिवसेनाप्रमुखांविषयी देखील त्यांना आदर होता आणि आजही आहे. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. पण ही सगळी दबदबा असलेली मंडळी घरी यायची, त्यांना जवळून पाहण्याची आणि बोलण्याची संधी मी सोडत नसे.

  श्री मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये नितीन गडकरी यांनी केवळ पूलच नाही बांधलेत, तर अगदी थेट राज्याच्या टोकापर्यंत रस्ते बांधून तसेच इतरही उल्लेखनीय कामे करून आपल्या नावाचा एक बँड तयार केला होता. हे त्यांनी जाणीवपूर्वक केले नव्हते. मुद्दामहून आणि काहीतरी करण्याचा अविर्भाव आणण्याची त्यांना गरज नाही, ते स्वाभाविक उर्मीने काम करतात म्हणूनच जेव्हा पाहावे तेव्हा ते कायम कामाने पछाडलेले.

  गडकरी म्हणजे नो नॉनसेन्स. आणि म्हणूनच आज केंद्रात दुसऱ्यांदा त्यांच्यावर महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी टाकण्यात आली. ईवाहन,पर्यायी इंधनासाठी वीज, इथेनॉल, वाहनांना फास्ट टॅग, सागरी वाहतूक अशा देशाला आधुनिक वाहतूक यंत्रणेकडे नेणाऱ्या अनेक बाबी केवळ गडकरी यांच्यासारख्या महाराष्ट्रीय नेत्यामुळे होऊ लागल्या आहेत हे मराठी माणूस म्हणून आम्हा सर्वाना अभिमानास्पद आहे.

  देशातले रस्ते आणि पूल बांधताना गडकरीजींनी त्याबरोबरच माणसे जोडली, लोके जोडली हे मला जास्त भावते. आज राजकारणात पुढे पुढे जात असतांना आपल्याबरोबर किती जण साथ साथ येताहेत हे पाहणेही महत्त्वाचे असते आणि फार कमी जणांना ते जमते.

  गडकरी हे कधीही मला तोडफोडीचे राजकारण करताना दिसले नाहीत. मुळात हा माणूस राजकारणी नाहीच असं माझं मत आहे. या कोरोना काळात तर त्याची प्रचिती आलीच. कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक जण जात पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून लढाईत उतरलेत. राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय, अशा वेळी राजकारणात न रमता गडकरीजी स्वत: नागपुरात ठाण मांडून ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन्स, वैद्यकीय सुविधा यात काही कमी जास्त हवे आहे का ते पाहताहेत.

  प्रशासनाच्या संपर्कात आहेत. माझ्याशीही त्याचे बोलणे सुरू असते. या संसर्गाच्या अनुषंगाने त्यांच्या सूचनांचा देखील आम्ही स्वीकार करतो. त्यांच्या या सहृदयतेबद्धल मी तेव्हाही त्यांचे आभार मानले आहेत आणि आजही परत एकदा या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो. केंद्र आणि राज्य सरकार एकोप्याने काम करत आहेत. मात्र, जे राजकारणात मग्न आहेत. त्यांना जे करायचे ते करु द्या, महाराष्ट्र सरकारच्या पािठशी उभे रहा हा त्यांचा सल्ला म्हणजे खरोखरच आजच्या काळातला आवर्जून शिकण्यासारखा धडा आहे.

  गडकरीजी यांचे व्यक्तिमत्व, झपाट्याने काम उरकण्याची क्षमता, अभ्यास आणि प्रशासनावरचा वचक, स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलणे वगैरे गोष्टी सर्वाना माहिती आहेत, त्या मी सांगणार नाही. पण एक गोष्ट सांगतो की, त्यांच्यात माणुसकी आहे. कुठलेही विकास आणि प्रगतीचे काम करताना त्या कामाचा सर्वसामान्य जनतेला कसा उपयोग होईल, प्रकल्पामुळे जे बाधित होताहेत त्यांच्या लाभाचे काय याचाही अतिशय बारकाईने विचार ते करतात.

  कोरोनाचा विषय सुरू आहे म्हणून सांगतो की, मध्यंतरी कोरोनातून बरे झाल्यावर पोस्ट कोविडमध्ये कशी काळजी घ्यावी. तसेच योग्य श्वसन करून कसे आरोग्यदायी राहावे अशा विषयावर मी त्यांचे यूट्यूब व्हिडीओ पाहिले. लाखो फॉलोअर्स आज त्यांना मिळाले आहेत. कोरोनाशी लढा देत आपण एकटेच बरे होऊत असा विचार न करता या संकटाला त्यांनी संधीत बदलले. हे फक्त सकारात्मक उर्जा असलेला माणूसच करू शकतो. आणि म्हणूनच अजातशत्रू असलेल्या नितीनजी गडकरी यांना मी पुनश्च एकदा दीर्घायुरोग्य चिंतितो आणि भविष्यात अशीच यशाची अधिकाधिक शिखरे चढत त्यांच्या हातून देशसेवा घडो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

  उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य