कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ देशव्यापी लॉकडाउन जाहीर करा : ॲड रेवण भोसले

कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन देशव्यापी लॉकडाऊन तात्काळ जाहीर करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.

    उस्मानाबाद : देशात कोरोनाच्या संसर्गामुळे येथे १ ऑगस्ट पर्यंत १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे भाकीत ब्रिटनमधील प्रख्यात वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’ने केला आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशव्यापी लॉकडाऊन तात्काळ जाहीर करण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

    लसीकरण झाल्याशिवाय निर्यात नको

    कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेला कृतीगट अधिक क्रियाशील करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रमाणे अमेरिकेतील संपूर्ण लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय बाहेर लस निर्यात करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्या राष्ट्राने घेतली होती तीच भूमिका भारत सरकारने आपल्या देशात तयार होणाऱ्या दोन कंपन्यांमधील लस् येथील संपूर्ण लोकांचे लसीकरण झाल्याशिवाय आम्ही निर्यात करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेणे ही काळाची गरज आहे. देशावर आलेल्या या आपत्तीला राजकीय रंग न देता या संकटातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी सर्व राज्यांना संपूर्ण मदत व सहकार्य करण्याची गरज आहे.

    प्राथमिक आरोग्यकेंद्र केंद्र उभारा

    कोरोना साथीच्या संकटात राज्य व केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायूचे लोकसंख्येच्या आधारे पुरवठा करून रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत करावी. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे पूर्णपणे यश मिळाले होते परंतु दुसऱ्या लाटेत एप्रिल नंतर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. भारतात ८० कोटी लोक ग्रामीण भागात राहतात.  सार्वजनिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होताना दिसत नाहीत, त्यामुळे सरकारने स्थानिक आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र केंद्र उभारावीत .

    ग्रामिण भागावर लक्ष द्या

    भारतात कोरोना रुग्णांच्या हाल-अपेष्टा गंभीर बनत चालले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्या-राज्यात  लागू केलेले कठोर निर्बंध तोकडे पडत असल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात मोठ्या वेगाने पसरत आहे .शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे .त्यातच ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले अनेक शेतकरी घरीच दुखणे अंगावर काढतात. मोठ्या दवाखान्यात दाखल होत नाहीत .तसेच कोरोना चाचणी करायलाही जात नाही .त्यामुळे कोरोनाची लागण होऊन अनेक शेतकऱ्यांची कुटुंब उध्वस्त होत आहेत. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची सध्या अतिशय गरज आहे.

    कष्टक-यांचे लसीकरण करा

    देशभर शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी कामगार, स्थलांतरित या सर्वांचे युद्धपातळीवर लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्याचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. देशभर थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार  माजविला असून हातावर पोट असलेले मजूर ,कष्टकरी, श्रमजीवी, शेतमजूर, सर्व क्षेत्रातील हमाल, माथाडी व कामगार ,फळे ,भाजीपाला विक्रेते फेरीवाले, हात गाडावाले, सुतार ,वायरमन ,प्लंबर इत्यादी सर्व प्रकारचे कारागीर, टॅक्सी ,रिक्षावाले, धोबी ,सलून, कोळी इत्यादी स्वरूपाचे सर्व बलुतेदार घटक ,छोटे दुकानदार, मोलकरीण व हॉटेल्स इत्यादी सर्व  सेवा उद्योग, सर्वसामान्य कर्मचारी व नोकरदार तसेच कनिष्ठ मध्यम वर्गीय यांचा रोजगार संपुष्टात आल्याने कोरोना नव्हे तर भूक बळीने मजूर मरण्याची भीती या गोरगरीब सर्वसामान्य वर्गाला सतावत आहे.

    अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पॅकेज

    पीक वाया गेल्यामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे .औद्योगिक क्षेत्रातही  पुन्हा उभे राहणे हे सर्व सूक्ष्म ,लघु व मध्यम व काही प्रमाणात मोठे उद्योगांनाही प्रचंड मोठे आव्हान उभे राहिले आहे .त्यामुळे 80 टक्के जनता हलाखीत जीवन जगत आहे. त्यांची आज उदरनिर्वाह करताना दमछाक होत आहे .उपासमारीची भीती सतावत आहे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज जाहीर करणे ही अत्यंत गरजेचे आहे तरी कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन देशव्यापी लॉकडाऊन तात्काळ जाहीर करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.