साहित्य, कला, सहकार, विज्ञान या क्षेत्रा व्यतिरिक्तच्या शिफारशी राज्यपालांनी फेटाळण्याची मागणी 

उस्मानाबाद:  साहित्य, कला, सहकार किंवा सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा या उद्देशाने विधान परिषदेवर पाठवण्यासाठी १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(bhagat singh koshyari) यांच्याकडे केली आहे. साहित्य, कला, सहकार, विज्ञान या क्षेत्रा व्यतिरिक्तच्या शिफारशी राज्यपालांनी फेटाळाव्यात अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने पाठवलेल्या यादीत  एकनाथ खडसे, राजू शेट्टी,  सचिन सावंत,  मुजफ्फर हुसेन,  रजनी पाटील ही नावे राजकीय क्षेत्रातील असून त्यांची नावे राज्यपालांनी फेटाळणे योग्य होईल असे मत ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करता येते याबाबत घटनेच्या १७१ (५ )कलमात तरतूद करण्यात आली आहे.  विज्ञान, कला ,सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले यांची राज्यपाल नियुक्ती करू शकतात असे घटनेत म्हटले आहे. मात्र, सामाजिक कार्य या घटनेतील तरतुदीचा सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच दुरुपयोग केला  जातो. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदार नियुक्त करण्याची प्रक्रिया करणं अपेक्षित असलं तरी अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्यपाल  यांच्याकडेच असतात. ॉ

मंत्रिमंडळाने शिफारस केलेली या क्षेत्रा व्यतिरिक्त नावे घटनेच्या निकषात बसत नसतील तर, राज्यपालांनी त्या नावास हरकत घेतली तर ती घटना बाह्य ठरणार नाही. मंत्रिमंडळाने शिफारस केलेली नाव जसेच्या तसे स्वीकारले जाऊ नयेत .घटनेतील तरतुदीनुसार विविध क्षेत्रातील तज्ञांची नावे असली तरच मान्यता देणे घटनेला अभिप्रेत आहे.

महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी प्रत्येकी  चार जागा वाटून घेऊन आपल्या पक्षातील राजकीय पुढाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांची नावे राज्यपालाकडे पाठवली आहेत. त्यामुळे घटनेमध्ये ज्यांच्यासाठी तरतूद केली आहे त्यालाच राजकीय पक्षाकडून  तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवलेले व राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून काम करणारे या सर्वांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फेटाळून लावावी असे ॲड भोसले म्हणाले.