उस्मानाबादच्या लौकिकात भर ; सारिका काळेला अर्जुन पुरस्कार

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार, सुवर्णकन्या सारिका काळेला क्रीडा क्षेत्रातील भारतातील मानाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.  सारिकाने  खो खो स्पर्धेतील आपल्या कामगिरीने उस्मानाबाद जिल्ह्याच्या लौकीकात भर घातली आहे. 

सारिका ही उस्मानाबाद जिल्हयातील खो-खो खेळाडू आहे. सारिकाची  राष्ट्रीय खो-खो संघाची  कर्णधार म्हणून निवड झाली आहे. गुवाहाटीमधील स्पर्धेदरम्यानही तिची निवड करण्यात आली होती.सातत्य आणि परिश्रमामुळे सारिकाला एवढे मोठे यश मिळालं आहे.सारिका सध्या तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार तिला २९ ऑगस्टला दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.

सारिका काळेची कारकीर्द 

– उस्मानाबादमधील सारिका इयत्ता सातवीत असताना म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षापासून खो-खो खेळत आहे.

– सारिकाने मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्षांच्या वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

– तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

– तिने  दक्षिण एशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१६मध्ये आसाम गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड झालेल्या सारिकाने तेथेही  सुवर्णपदक मिळविले होते.  

– क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला. शासनाने तिचा गौरव करत तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली.