
उस्मानाबाद : चारित्र्य तपासणीसाठी पत्नीला उकळत्या तेलातून पाच रुपयाचे नाणं बाहेर काढण्याची शिक्षा देणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा व्हिडिओ सोलापूर मधला असल्याची चर्चा होती पण हा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडला असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. यानंतर तिचा खरे खोटा तपासण्यासाठी त्याने अजब न्याय निवाडा केला. या महिलेने विरोध करूनही पतीने तीचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली.
उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते. हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. असा आघोरी न्यायनिवाडा येथील जात पंचायत करत असते. अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरूनच या आरोपी पतीने आपलल्या महिलेची चरित्र तपासणी केली.
या आरोपी पतीने तीन दगडांची चुल मांडली. सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. यांनतर त्याने ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले.
या महिलेने उकळत्या तेलात हात घातला व तिचा हात भाजला आहे. या पतीने या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरलही केला. यांनतर या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी होत होती. पोलिसांनी यांची गांभीर्याने दखल घेत ही अघोरी शिक्षा देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.