प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना महासाथरोगाच्या काळात देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा आणि उत्पादन वाढविण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मोठ-मोठ्या उद्योजकांनीही यात हातभार लावला आहे. अशातच, देशातील साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव या खासगी साखर कारखान्यामध्ये उत्पादित होऊ लागला आहे.

    उस्मानाबाद : कोरोना महासाथरोगाच्या काळात देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा आणि उत्पादन वाढविण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मोठ-मोठ्या उद्योजकांनीही यात हातभार लावला आहे. अशातच, देशातील साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव या खासगी साखर कारखान्यामध्ये उत्पादित होऊ लागला आहे.

    धाराशिव साखर कारखान्याने करून दाखविले

    धाराशिव साखर कारखान्यातील सिलिंडर निर्मितीला लवकरच वेग दिला जाणार आहे. ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाण येत्या काही दिवसात 600 सिलेंडरपर्यंत जाईल. एखाद्या साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयोग होऊ शकतो, यावर कोणालाच विश्वास नव्हता पण हे धाराशिव साखर कारखान्याने करून दाखवले आहे. इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती धाराशिव कारखान्यामध्ये होते. त्यासाठी 60 कोटी रुपये गुंतवणूक करून यंत्रणा उभारलेली आहे. हा प्रयोग पूर्वीचीच यंत्रणा वापरून करायचे ठरले. आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक कारखान्याने यासाठी केली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन प्लांटसाठी परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधून मॉलिक्युल आणावे लागले.

    शरद पवारांनी दिला होता सल्ला

    ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, असा सल्ला दिला होता. परंतु आजपर्यंत केवळ चारच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठीच्या यंत्रणेची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्या बरोबर इथेनॉल पुरवठ्याचे करार आहेत. इतर साखर कारखानदारांना ते करार अडचणीत येतील, नुकसान होईल, अशी भीती आहे. पंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर नुकसान सोसत हे पाहिले पाऊल उचलले.

    इथेनॉल प्रकल्पातच होतेय उत्पादन

    23 एप्रिल रोजी झूमद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची वसंतदादा इन्स्टिट्यूटने बैठक घेतली होती. राज्यात 174 इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून आता अभिजित पाटील यांच्यानंतर इतर कारखान्याने हा प्रकल्प हातात घेतल्यास राज्यालाच नाही तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात तयार होऊ शकणार आहे. इथेनॉल प्रकल्प ज्या कारखान्यांकडे सुरू आहेत, अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येते, हे अभिजीत पाटील यांनी लक्षात घेत आपल्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती केली आहे.