प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 23 जुलैपर्यंत मुदतवाढ, महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ लाखांहून अधिक शेतकरी सहभागी

  उस्मानाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली होती तर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकारनं तसा प्रस्ताव द्यावा, मुदत वाढवून देऊ, असं म्हटलं होतं. राज्य सरकारनं केंद्र सरकारला पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची मुदत वाढवण्यासाठीचा प्रस्ताव दिला आणि अखेर केंद्र सरकारनं राज्याची विनंती मान्य करत मुदत 23 जुलैपर्यंत वाढवली आहे. पीक विमा भरण्यास 15 जुलै अंतिम तारीख होती मात्र अनेक शेतकऱ्यांचा विमा न भरला गेल्याने 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

  दरम्यान शेतकऱ्यांना आता 23 जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार आहे, अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली आहे.

  46 लाख शेतकऱ्यांचा योजनेसाठी अर्ज

  कृषीमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेसाठी 15 जुलैपर्यंत सुमारे 46 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत असे सांगितले. राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्यानं केंद्राकडं केली होती.

  पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम

  भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

  विमा हप्त्याची रक्कम कुठे भरायची

  शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठाव संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता भरु शकतात.