आत्मसन्मान असता, तर त्यांनी राजीनामा दिला असता !

जर त्यांना आत्मसन्मान असता, तर त्यांनी राजीनामा दिला असता, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

उस्मानाबाद : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील भाषा आणि आशय याबद्दल आक्षेप घेणारं पत्र नुकतंच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. याबाबत उस्मानाबाद दौऱ्यावर असताना पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. पवार म्हणाले, “आत्मसन्मान असणारी कुणीही व्यक्ती अशा परिस्थितीत पदावरून पायउतार झाली असती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील पत्रातील काही शब्द आक्षेपार्ह असल्याचं म्हटलंय. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आम्ही करण्याची गरजच काय? अशा परिस्थितीत पदावर राहायचं की नाही याचा विचार त्या व्यक्तीनंच केला पाहिजे.”

महाराष्ट्रातील धर्मस्थळं उघडण्याच्या मुद्द्यावरून नुकतंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तुम्हीदेखील आता सेक्युलर झालात काय, असा सवाल राज्यपालांनी या पत्रातून केला होता. घटनेचं रक्षण करण्याची जबाबदारी असणारे राज्यपाल असा प्रश्न कसा विचारू शकतात, असा सवाल पवारांनी त्यांच्या पत्रातून उपस्थित केला होता.